पाहिल्या पाहिल्या पटकन स्वस्तात मस्त उपाय म्हणावं असंच वाटावं. पण ६५ वर्षीय नारायण देसाईंसाठी मात्र हे त्यांच्या कलेचं ‘मरण’ आहे. कशाविषयी हे सगळं सुरू आहे असा प्रश्न पडला असेल तर त्यांच्या सनईत कराव्या लागणाऱ्या बदलांची ही गोष्ट. बाजारपेठेपुढे मान तुकवून त्यांना आता हे सगळं मान्य करावं लागतंय. पण त्यांच्या कलेच्या अस्तित्वावरच त्यातून प्रश्न उभा राहिलाय हे नक्की.
लग्न, सण समारंभ किंवा गावात काहीही कार्यक्रम असला तर तिथे सनई असतेच.
अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत नारायणभाऊ ज्या सनया तयार करायचे त्याला पितळेचीच वाटी असायची. हाताने कोरलेल्या लाकडी सनईतून उमटणाऱ्या स्वरांचं सौंदर्य वाढतं ते या पितळी वाटीमुळेच. १९७०च्या दशकात जेव्हा सनई तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय अगदी जोमात होता तेव्हा नारायणभाऊंकडे किमान डझनभर पितळी वाट्या तयार असायच्या. बेळगाव जिल्ह्यातल्या चिकोडीमधून त्या आणून ठेवलेल्या असायच्या.
पण गेल्या काही वर्षांमध्ये जवळ जवळ पन्नास वर्षं जी कला जपली, जोपासली तीमध्ये त्यांना बदल करावे लागले आहेत. त्यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेतः पितळी वाट्यांच्या वाढलेल्या किंमती आणि चांगली सनई करण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेऊन तशी किंमत देण्यास गिऱ्हाईक करत असलेली खळखळ.
“लोक मला म्हणाया लागले, ३००-४०० रुपयात सनई विका म्हणून,” ते सांगतात. आता ही मागणी पुरी करणं अवघडच कारण नुसती पितळी वाटीच ५०० रुपयांना मिळायला लागल्याचं ते सांगतात. किंमतीमुळे किती तरी जणांनी खरेदी करणं टाळल्यानंतर त्यांनी एक युक्ती शोधून काढली. “गावातल्या जत्रेतून मी प्लास्टिकच्या पिपाण्या घेऊन आलो. त्यांचं पुढचं तोंड कापलं (त्याचा आकार सनईच्या वाटीसारखा असतो) आणि ते या पितळी वाटीच्या जागी बसवलं.”
“आता आवाजावर परिणाम होतोच की, पण आता लोकांची त्यालाच मागणी आहे,” ते खेदाने म्हणतात. एखादं चोखंदळ गिऱ्हाईक असेल तर ते आजही त्यांना हवी तशी वाटी बसवून देतात. प्लास्टिकची तोंड बसवायला त्यांना फक्त १० रुपये खर्च येतो. पण आपल्या कलेशी अशी तडजोड करावी लागते याचं त्यांना वाटणारं वैषम्य मात्र मोजण्यापलिकडचं असतं.


नारायण देसाई प्लास्टिकची पिपाणी (डावीकडे) दाखवतायत. आजकाल सनईच्या तोंडाला पितळी वाटीच्या जागी ते प्लास्टिकची वाटी (उजवीकडे) बसवतायत
आणि हो, त्यांना हे मान्य आहे की जर ही युक्ती सापडली नसती तर कर्नाटकाच्या उत्तरेला असलेल्या माणकापूरमध्ये सनई तयार करण्याची ही परंपरा अस्तंगत झाली असती. ८३४६ लोकसंख्या असलेलं हे गाव कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर आहे.
बेळगाव जिल्ह्यातली गावं असोत किंवा महाराष्ट्रातली, लग्नं, सण समारंभ आणि कुस्त्यांच्या सामन्यांवेळी सनई वाजतेच. “अगदी आजही आम्हाला कुस्त्यांच्या सामन्यांचं बोलावणं येतं,” ते अगदी अभिमानाने सांगतात. “ही परंपरा आजही तशीच सुरू आहे. सनई वाजवणारा नसला तर सामना सुरूच होत नाही.”
साठीचं दशक सरता सरता आणि सत्तरच्या दशकामध्ये त्यांच्या वडलांना, तुकाराम यांना महिन्याला पंधरा सनयांचं काम मिळायचं. तेही अगदी दूर-दूरच्या गावांमधलं गिऱ्हाईक असायचं. सध्या नारायणभाऊंना महिन्यातून जास्तीत जास्त दोन सनयांचं काम मिळतंय. “सनईच्या निम्म्या किंमतीत बाजारात हलका माल यायला लागलाय की,” ते म्हणतात.
नव्या पिढीला आता सनईचं फारसं महत्त्व वाटेनासं झालंय आणि त्याचा दोष ते ऑर्केस्ट्रा, म्युझिक बँड आणि इलेक्ट्रॉनिक संगीताला देतात. त्याचा थेट परिणाम सनईच्या मागणीवर झाला आहे. त्यांच्या स्वतःच्या घरात, गोतात त्यांचा २७ वर्षीय भाचा, अर्जुन जाविर सोडला तर माणकापूरमध्ये आता कुणीच सनई वादवत नाही. तसंही अख्ख्या माणकापूरमध्ये सनई आणि बासरी बनवणारे नारायणभाऊ एकटेच कारागीर उरले आहेत.
*****
नारायण भाऊ शाळेत कधीच गेले नाहीत. वडील आणि आजोबांबरोबर ते गावातल्या जत्रांना जायचे तेव्हाच ते सनई बनवायची कला शिकले. दत्तुबा तेव्हा बेळगाव जिल्ह्यातले सगळ्यात निष्णात सनई कारागीर होते. “ते दोघं सनई वाजवायचे आणि मी नाचायचो,” ते सांगतात. वयाच्या १२ व्या वर्षी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात आपण कसे शिरलो ते नारायणभाऊ सांगतात. “कसं असतं, लहानपणी एखादं वाद्य कसं वाजतं त्यासाठी त्याला हात लावावासा वाटायचा. मला पण फार उत्सुकता असायची,” ते सांगतात. ते स्वतःच सनई आणि बासरी वाजवायला शिकले. “ही वाद्यं वाजवाया आली नाहीत, तर बनवाया कशी येणार?” ते मस्त हसत विचारतात.

सनई तयार करण्यासाठी नारायण भाऊ अशी काही हत्यारं वापरतात

सनईच्या जिभलीतून नीट सूर येतायत की नाही हे पाहताना नारायण भाऊ
वडील वारले तेव्हा नारायण भाऊ फक्त १८ वर्षांचे होते. आपली कला आणि वारसा आपल्या मुलाच्या हाती सोपवून ते गेले. नारायणभाऊंचे सासरे आनंदा केनगर माणकापूरमधले आणखी एक निष्णात सनई आणि बासरी कारागीर. त्यांच्या तालमीत नारायण भाऊंनी आपली कला अधिक फुलवली.
नारायण भाऊ होलार या दलित समाजाचे. सनई आणि डफडं वाजवणं हा त्यांचा परंपरागत व्यवसाय. नारायण भाऊंसारखे काही जण वाद्यं तयारही करायचे. पण आजही ही कला केवळ पुरुषांचीच मक्तेदारी आहे. “आधीपासून आमच्या गावात केवळ गडीच सनई बनवायचं काम करत आलेत,” ते सांगतात. त्यांची आई दिवंगत ताराबाई शेतमजुरी करायची आणि सगळ्या घराचा डोलारा तिनेच सांभाळला. कारण घरची पुरुष मंडळी लगीनसराई आणि कुस्त्यांचे फड लागले की सहा सहा महिने घराबाहेरच असायची.
तरुणपणी नारायण दर वर्षी आपल्या सायकलवर ५० जत्रांना जात असत. “मी पार खाली गोव्याला जायचो आणि बेळगाव, सांगली आणि कोल्हापूरच्या गावांमधल्या जत्रा करायचो,” ते सांगतात.
सनयांची मागणी जरी घटली असली तरी आजही नारायणभाऊ आपल्या ८ बाय ८ कार्यशाळेत किती तरी तास कामात मग्न असतात. त्यांच्या एक खोलीच्या घराशेजारीच असलेल्या या जागेत साग, खैर आणि देवदार तसंच इतरही लाकडाचा गंध दरवळत असतो. “मला इथं बसाया आवडतं. लहानपण आठवतं,” ते म्हणतात. दुर्गामाता आणि हनुमानाच्या जुन्या पुराण्या तसबिरी भिंतीवर दिसतात. भिंती शाळूचा कडबा आणि उसापासून बनवलेल्या. त्यांच्या या कार्यशाळेत अगदी मध्यावर एक उंबराचं झाड आहे जे वरती पत्र्याच्या बाहेर आभाळात गेलंय.
गेल्या पन्नास वर्षांपासून याच जागी बसून त्यांनी आजवर किमान ५,००० सनया बनवल्या असतील. आणि त्या करण्यासाठी ३०,००० तास श्रम घेतले असतील. सुरुवातीला त्यांना एक सनई तयार करण्यासाठी सहा तास लागायचे, तेच आता ते चार तासात करतात. अगदी सगळी प्रक्रिया त्यांच्या नसानसात भिनलेली आहे. “झोपेतून उठवलात ना तरी सनई बनवेन,” सनई तयार कशी होते ते दाखवता दाखवता ते म्हणतात.

सगळं साहित्य गोळा केलं की पहिली पायरी म्हणजे आरीने सागाची फांदी कापायची


डावीकडेः लाकडाचा तुकडा कापून घेतला की नारायण भाऊ तासून तासून त्याला शंकूसारखा आकार देतात. उजवीकडेः वरून जिभळी गुळगुळीत व्हावी म्हणून ते काचेच्या तुकड्याने लाकूड तासण्याचं काम करतात
सुरुवातीला ते आरीने सागाचा एक तुकडा कापतात. आधी ते खैर, चंदन किंवा शिसम वापरायचे कारण त्या लाकडातून जास्त मंजुळ स्वर निघतात. “कसंय, तीस वर्षांपूर्वी माणकापूर आणि आसपासच्या गावात तसली झाडंही बरीच होती. आता दिसत नाहीत,” ते सांगतात. एक घनफूट खैराच्या लाकडातून पाच सनया बनतात. त्यानंतर जवळ जवळ ४५ मिनिटं ते रंधा मारून लाकूड तासतात. “यात काही जरी गडबड झाली तर सनई चांगली वाजत नाही,” ते म्हणतात.
फक्त रंधा मारून लाकूड त्यांना हवं तितकं गुळगुळीत होत नाही. मग खोलीत नजर टाकतात आणि एक पांढरं पोतं काढतात. त्यात काचेची बाटली असते. जमिनीवर आपटून ती फोडतात आणि काचेचा एक तुकडा घेऊन लाकूड तासू लागतात. आपला स्वतःचाच ‘जुगाड’ त्यांना मनापासून आवडतो आणि ते हसतात.
यानंतरची पायरी म्हणजे शंकूसारख्या या लाकडाच्या दोन्ही टोकांना भोकं पाडून ते पोकळ करणं. यासाठी ‘गिरमिट’ म्हणजे लोखंडाच्या बारीक कांबी वापरतात. त्यांच्या घरापासून १० किलोमीटरवर इचलकरंजीला जाऊन ते २५० रुपयाची इमरी म्हणजेच धार करायचा दगड आणतात आणि त्यावर या गिरमिटाचं टोक काढून घेतात. लोखंडी सगळं साहित्य ते स्वतः तयार करत असल्याचं ते सांगतात. आणि हेही की या गोष्टी विकत घेणं परवडणारं नाही. त्यानंतर ते या कांबीने लाकूड आतून पोकळ करून घेतात. यात काही जरी चूक झाली तर त्यांच्या हाताला दुखापत होऊ शकते पण असली कसलीही भीती त्यांच्या मनात येत नाही. आरपार भोक पडलं की ते त्यातून नजर टाकतात काही सेकंद नीट तपासतात. मनासारखं काम झालं की पुढची पायरी. आणि ही सगळ्यात महत्त्वाची. सात स्वरांची सात भोकं पाडणं.
“ अगदी कणभरही इकडे तिकडे झालं तर बेसूर होणार. नंतर दुरुस्त करता येतंय का, ” ते म्हणतात. चूक होऊ नये म्हणून ते यंत्रमागात वापरली जाणारी प्लास्टिकची रिळं असतात ना, त्याच्यावर स्वरांच्या सात जागांच्या खुणा करून ठेवतात. त्यानंतर १७ सेंटिमीटर लांब लोखंडी सळी चुलीत तापवायचं काम सुरू होतं. “आम्हाला कुठलं ड्रिलिंग मशीन परवडायला? म्हणून ही आपली जुनी पद्धत.” लोखंडी सळी तापवून लाकडाला भोक पाडणं काही साधं काम नाहीये. ते शिकता शिकता कितीदा तरी त्यांना भाजलं आहे. “भाजणार, कापणार... चालायचंच,” ते म्हणतात. तीन सळ्या रसरशीत तापवून सुरांची भोकं करण्याचं काम बोलता बोलता सुरूच होतं.
हे सगळं करायला त्यांना ५० मिनिटं लागली. या सगळ्या कामात त्यांच्या नाकातोंडात बराच धूरही गेला. खोकत शिंकत पण एक क्षणभरही न थांबता त्यांचं काम सुरू होतं. “हे झटक्यात करावं लागतं. सळी गार पडली की परत तापवायची तर आणखी धूर येतो.”
एकदा का स्वरांची भोकं पाडून झाली की ते सनई धुऊन घेतात. “हे लाकूड पाण्याने खराब होत नाही. एकदा सनई केली की वीस वर्षं तिला काही होत नाही,” ते अगदी अभिमानाने सांगतात.


ड्रिलिंग मशीन परवडत नसल्याने नारायण भाऊ लोखंडी सळी वापरून लाकडाला भोकं पाडतात. या कामाला त्यांना ५० मिनिटं लागतात आणि ते करता करता या आधी त्यांना भाजल्याच्या अगदी खोल जखमा झाल्या आहेत


लाकडावर भोकं पाडत असताना कुठलीही चूक होऊ नये यासाठी ते यंत्रमागावर वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या रिळावर आधी खुणा करून घेतात. ‘अगदी कणभरही इकडे तिकडे झालं तर बेसूर होणार,’ ते म्हणतात
यानंतर काम सुरू होतं सनईच्या जिभलीचं. यासाठी ते ताडाचं पान वापरतात. एक प्रकारचा बारमाही वेळू असतो त्याचं हे पान. त्यासाठी आधी वेळू २०-२५ दिवस भिजत घालतात. त्यानंतर सगळ्यात भारी वेळूच्या १५ सेंटिमीटर लांबीच्या पट्ट्या काढतात. एक डझन पट्ट्या ५० रुपयांना मिळतात. “पान मिळवायचं म्हणजे दिव्यच असतं,” ते सांगतात.
आता ताडाच्या पानाच्या पट्टीच्या चार घड्या घालतात. मग ती अर्धा तास पाण्यात भिजत घालतात. सनईचं काम पूर्ण झालं की याच पानातून हवा जाते, कंपनं होतात आणि हवा तसा सूर निघतो. यानंतर हवा तेवढा आकार ठेवून, टोकं कापून टाकतात आणि सुती पांढऱ्या धाग्याने खोडाला जिभली बांधून टाकतात.
“जिभलीला आकार देणं कठीण असतं,” ते सांगतात. हे नाजूक काम करता करता कपाळावर दाटून आलेल्या घामात लाल गंध मिसळून मिटून जातो. धारदार पत्तीने तर्जनीला किती तरी वेळा कापलं जातं तरी त्यांचं त्याकडे मुळी लक्षच नसतं. “आता कापल्या खुपल्याला बघत बसलो, तर सनई कधी करावी?” ते हसतात. जिभली मनासारखी जमल्यानंतर ते सनईच्या तोंडाला प्लास्टिकची वाटी बसवण्याच्या कामाकडे वळतात. पूर्वी पितळेची वाटी बसवली जायची.
नारायण भाऊ वेगवेगळ्या आकाराच्या सनया बनवतात. २२, १८ आणि नऊ इंची. त्यांची किंमत अनुक्रमे रु. २०००, रु. १५०० आणि रु. ४०० इतकी असते. “बावीस आणि अठरा इंची सनयांना कधी तरीच मागणी असते. दहा वर्षांपूर्वी बनविली असेल,” ते म्हणतात.


नारायण भाऊ ताडाचं पान भिजवून ठेवतात म्हणजे मऊ पडल्यावर जिभली तयार करणं सोपं जातं. ही जिभली सनईचा अगदी महत्त्वाचा भाग आहे कारण तिच्यावरच स्वर कसा निघणार ते ठरतं


डावीकडेः पत्तीच्या मदतीने घडी घातलेल्या ताडाच्या पानाला नारायण भाऊ जिभलीचा आकार देतात. उजवीकडेः त्यानंतर सुती पांधऱ्या धाग्याने ते ही जिभली सनईच्या खोडाला अलगद बांधून घेतात
त्यांच्या हाताने बनवलेल्या लाकडी बासऱ्यांनाही आताशा तितकी मागणी नाही. “लोकांना लाकडी बासऱ्या नकोत. का तर त्या महाग असतात.” म्हणून मग तीन वर्षांपासून ते काळ्या आणि निळ्या पीव्हीसी पाइपपासून बासऱ्या तयार करतायत. या बासऱ्यांची ५० रुपयांपर्यंत असते तर लाकडी बासरी १०० रुपयांना विकली जाते. लाकूड किती चांगलंय त्यावर किंमत ठरते. आपल्याला अशी सगळी तडजोड करावी लागते हे काही नारायण भाऊंना फारसं आवडत नाही. “लाकडाची बासरी आणि पीव्हीसीची, दोन्हीची तुलना तरी होऊ शकते का, सांगा,” ते म्हणतात.
हाताने सनई तयार करायची तर कष्ट भरपूर आहेत. चुलीच्या धुरामुळे खोकला येतो, श्वास लागतो. वेळूचं काम करायचं तर वाकून वाकून पाठ भरून येते. वर इतकं केल्यानंतर पैसा काही फार मिळत नाही. असं सगळं असल्यामुळे तरुण मुलं या कलेकडे पाठ फिरवत असल्याचं ते सांगतात.
सनई तयार करणं सोपं नाहीच, पण ती वाजवणंही येऱ्यागबाळ्याचं काम नाही. २०२१ साली त्यांना कोल्हापूरच्या जोतिबापुढं सनई वाजवायला बोलावलं होतं. “एका तासात मी कोसळलो. सलाइन चढवाया लागलं,” ते सांगतात. त्या प्रसंगानंतर त्यांनी सनई वाजवणं थांबवलं. “सोपं नाही. सनई वाजवणाऱ्या वादकाच्या चेहऱ्याकडे नीट पहा. वाजवून झाल्यानंतर श्वास घ्यायला किती तडफड होते ते समजून घ्या. त्यावरनं तुम्हाला समजेल सनई वाजवणं किती अवघड आहे ते.”
पण तरीही सनई बनवणं काही ते थांबवणार नाहीत. “कलेत सुख आहे,” ते सांगतात.


डावीकडेः जास्त किंमतीमुळे तीन एक वर्षांखाली लाकडाच्या सनयांची मागणी कमी व्हायला लागली. त्यानंतर नारायण भाऊ काळ्या आणि निळ्या पीव्हीसी पाइपपासून सनई बनवू लागले. उजवीकडेः सनई तयार करत असताना काही कमी जास्त झालंच तर असू दे म्हणून ठेवलेलं जास्तीचं लाकूड कापून टाकलं जातं


डावीकडेः नारायण भाऊंनी आजवर ५,००० हून जास्त सनया तयार केल्या आहेत म्हणजेच गेल्या पन्नास वर्षांत ३०,००० तासांहून जास्त श्रम. उजवीकडेः अर्जुन जाविर आपले आजोबा दिवंगत मारुती देसाई यांचा फोटो हातात घेऊन. माणकापूरमध्ये ते फार चांगले सनईवादक म्हणून परिचित होते
*****
फक्त सनई आणि बासऱ्या बनवून पोट भरायचं नाही हे नारायण भाऊंना फार आधीच समजलं होतं. त्यामुळे सुमारे तीस वर्षांपासून ते रंगीबबेरंगी भिरभिरं देखील तयार करतायत. “गावाकडच्या जत्रांमध्ये आजही लोक हे भिरभिरं घेतात. प्रत्येकाकडे गेम खेळायला मोबाइल फोन घेण्याइतके पैसे आहेत का.” दहा रुपयांत मिळणारं कागदी भिरभिरं आजही लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतं. आणि नारायण भाऊंच्या हातात चार पैसे.
भिरभिरं तसं बनवायला सोपं. ते सोडून ते इतरही अनेक खेळणी तयार करतात. त्यांना २० प्रकारचे कागदी पक्षी तयार करता येतात. १०-२० रुपयांना हे विकले जातात. “मी काय कुठल्या शाळेत शिकलो नाही हे. पण हातात कागद घेतला की त्याचं काही तरी करुनच खाली ठेवतो बघा,” ते म्हणतात.
कोविड-१९ ची महासाथ आली, त्यानंतर गावातल्या जत्रा आणि कार्यक्रमांवर बंदीच आली. तेव्हा मात्र त्यांच्या धंद्याला उतरती कळा लागली. “दोन वर्षं मी साधं एक भिरभिरं पण विकू शकलो नाही,” ते सांगतात. २०२२ साली मार्च महिन्यात माणकापूरची महाशिवरात्रीची जत्रा भरली ना तेव्हा परत काम सुरू झालं. मधल्या काळात त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला त्यामुळे आता प्रवास करणं त्यांच्यासाठी अवघड झालंय त्यामुळे भिरभरं किंवा इतर खेळणी विकण्यासाठी त्यांची सगळी भिस्त मध्यस्थांवर असते. “एक भिरभिरं विकलं तर त्यापाठी तीन रुपये द्यायचे त्याला,” ते सांगतात. “मला काय हे पसंत नाही. पण चार पैसे हातात येतात, बस्स,” नारायण भाऊ सांगतात. महिन्याला कशी बशी त्यांची ५,००० रुपयांची कमाई होते.


डावीकडेः नारायण भाऊंच्या पत्नी, सुशीला ताई वीटभट्टीवर कामाला जातात आणि नारायण भाऊंना त्यांची वाद्यं किंवा कागदी भिरभिरं तयार करायला मदत करतात. उजवीकडेः चार पैसे मिळावेत म्हणून तीस वर्षांपूर्वी नारायण भाऊंनी कागदी भिरभिरं तयार करून विकायला सुरुवात केली


डावीकडेः नारायण भाऊ लाकडी पट्टीवरच्या खुणांची मदत घेत बासरीसाठी स्वरांच्या जागांवर खुणा करतायत. त्यानंतर योग्य भोकं झाली का नाही हे तपासून पाहतायत (उजवीकडे)
त्यांच्या पत्नी, सुशीला ताई चाळीस-पंचेचाळीस वर्षांच्या आहेत. त्या वीटभट्टीवर कामाला जातात आणि घरी भिरभिरं तयार करायला मदत करतात. कधी कधी त्या त्यांना सनई आणि बासरी बवनण्यातही हातभार लावतात. इतकी वर्षं केवळ पुरुषांचाच मक्ता असलेल्या या कामात त्यांनी पाय ठेवलाय. “सुशीलाची मदत नसती तर हा व्यवसाय किती तरी वर्षांपूर्वीच बंद झाला असता,” नारायण भाऊ म्हणतात. “घर चालवायला तिची मदत होते.”
“माझ्याकडे फार काही कौशल्य नाही हो. एका जागी बसायचं आणि काही बाही बनवत रहायचं,” ते अगदी नम्रपणे म्हणतात. “आम्ही गेलो म्हणजे गेली कला,” ते म्हणतात. आणि बोलता बोलता सनई वाजवणाऱ्या आपल्या वडलांचा आणि आज्याचा फोटो हातात उचलून घेतात.
संकेत जैन लिखित ग्रामीण कारागिरांवरील या लेखमालेसाठी मृणालिनी मुखर्जी फाउंडेशनचे अर्थसहाय्य मिळाले आहे.