२० डिसेंबर २०१४ रोजी पारीच्या वेबसाइटचं प्रकाशन झालं.
कुणी विचारलं की आमचं सगळ्यात मोठं यश काय? तर हेच की आम्ही अजूनही आहोत. माध्यमजगतामध्ये कॉर्पोरेट सत्ता शीर्षस्थ असतानाही पत्रकारितेची एक स्वतंत्र वेबसाइट टिकून आहे, आणि नुसती टिकून नाही पाय रोवून उभी आहे, हे आमचं यश. आज पारीवर दररोज १५ भाषांमध्ये मजकूर प्रकाशित होतो आहे. आणि ही वेबसाइट आमच्या न्यासाचं मुख्य काम आहे. तिची सुरुवात झाली तेव्हा संस्थेकडचा कॉर्पस निधी होता शून्य रुपये. कुठलाही सरकारी निधी ना कुणी देऊ केला, ना आम्ही मागितला. कॉर्पोरेट क्षेत्राकडून कुठलेही थेट अर्थसहाय्य नाही ना कसली गुंतवणूक. जाहिराती आम्हीच नाकारल्या. पारीवरचा मजकूर वाचता यावा यासाठी कुठलंही शुल्क नाही. ज्यांनी पारीवर यावं, इथला मजकूर वाचावा, पहावा, ऐकावा असं आम्हाला वाटतं त्यातले बहुतेक असं शुल्क असलं तर इथे येऊच शकणार नाहीत. ही वेबसाइट स्वयंस्फूर्तीने, स्वेच्छेने काम करणाऱ्या अनेकांच्या कष्टातून, कौशल्यातून साकार झाली आहे. अनेक पत्रकार, तंत्रज्ञ, कलाकार, अध्यापक आणि इतरही अनेकांनी आपला वेळ आणि कौशल्य पारीसाठी देऊ केलं आहे. शिवाय आमचे विश्वस्त, अनेक वाचक आणि हितचिंतक आणि आमच्या स्वातंत्र्याला धक्का न लावणाऱ्या काही फौंडेशन्सच्या सढळ मदतीतूनच आमचं काम भक्कमपणे उभं आहे.
प्रामाणिक आणि डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या आमच्या सदस्यांच्या सक्षम नेतृत्वात पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया – पारी भौगोलिक किंवा ऐतिहासिक ओळख असलेल्या भारताच्या ९५ प्रांतांमधून नेमाने वार्तांकन करत आहे. पारी ही भारताच्या गावपाड्यांना वाहून घेतलेली वेबसाइट आहे. या गावपाड्यांमध्ये राहणारे ९० कोटी लोक, त्यांची आयुष्यं, उपजीविका, त्यांची संस्कृती आणि ते बोलत असलेल्या अगदी विशेष अशा ८०० भाषा हे सगळं पारीवर यावं हाच आमचा हेतू आहे. साध्यासुध्या माणसांचं रोजचं जगणं टिपणं हा आमचा ध्यास आहे. आणि हे करत असताना पोटापाण्यासाठी शहरांमध्ये गेलेल्या स्थलांतरित कामगारांचाही मागोवा आम्ही घेतो. या तब्बल एक अब्ज लोकांच्या गोष्टी आम्हाला ऐकायच्या आहेत, सांगायच्या आहेत.
पारीच्या अगदी प्रारंभापासूनच आम्हा संस्थापकांच्या मनात एक गोष्ट अगदी स्पष्ट होती. पारी पत्रकारितेची एक वेबसाइट असेलच पण सोबतच हा एक जिताजागता संग्रह असेल, याची खूणगाठ आम्ही बांधली होती. आणखी एक गोष्ट आम्ही पक्की ठरवून घेतली होती. ही वेबसाइट कॉर्पोरेट क्षेत्राने आखलेल्या ‘व्यावसायिक’ माध्यमाच्या वापरून गुळगुळीत झालेल्या व्याख्यांची चाकोरी धरणार नाही. तर मानवविद्या, विज्ञान आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक शास्त्रांची शिस्त, ज्ञान आणि बलस्थानं या वेबसाइटच्या उभारणीत मोलाची असतील. आणि म्हणूनच अगदी पहिल्या दिवसापासून आमच्या मंडळात पत्रकारितेचा दांडगा अनुभव असलेले लोक आणि त्यांच्या सोबत बाकी क्षेत्राचं सखोल ज्ञान असलेली मंडळी देखील सामील झाली.
आणि याचा परिपाक व्हायचा तो झालाच. वाद-विवाद, गैरसमज, अगदी कडूजार भांडणं आणि सावळागोंधळ. सगळं काही झालं. आणि त्यातून जे निर्माण झालं ते मात्र असामान्य होतं. अगदी खास. या वादांमध्येही सगळ्यांचं एका गोष्टीवर मात्र एकमत होतं आणि ते म्हणजे जो काही मजकूर पारीवर येईल त्यामध्ये आपला स्वतःचा आवाज पडद्यामागे असेल. भारतातले सामान्. साधेसुधे लोक इथे बोलतील. आणि त्यामुळेच वार्तांकन करायला जाणाऱ्या सगळ्या पत्रकार-वार्ताहरांसाठी तयार केलेली नियमावली देखील याच गोष्टीवर भर देते. लोक काय म्हणतायत ते तुमच्या लेखात येऊ द्या. तुमचा आवाज, तुमचं म्हणणं मागे असू दे. शिवाय आपण गोष्ट सांगणार आहोत. बातमीपत्र किंवा एखादा अभ्यासपूर्ण अहवालसुद्धा नाही मांडायचा. आणि खरं तर शक्य तिथे गावपाड्यातले शेतकरी, जंगला-वनांमध्ये राहणारे आदिवासी आणि इतर लोक, कामगार, विणकर, मच्छीमार आणि पोटापाण्यासाठी अनेक प्रकारचे व्यवसाय करणारे लोकच आपल्या स्वतःच्या गोष्टी सांगतील, लिहितील, चित्रित करतील हाच आमचा प्रयत्न आहे. लिहिणंच का, त्यांची गोष्ट म्हणजे त्यांचं गाणंही असेल कदाचित.


फक्त आणि फक्त भारताचे गावपाडे आणि इथल्या लोकांना समर्पित असलेली आमची वेबसाइट ही अशी एकमेव साइट आहे आणि इथे लोकच स्वतःच्या गोष्टी इथे सांगतात. जयम्मा बेल्लाया बंडीपूर अभयारण्याच्या वेशीवर असलेल्या अनंजीहुंडी गावात राहणारी जेनु कुरुबा आदिवासी आहे. ती आपला रोजचा दिवस कॅमेऱ्यात टिपते, अगदी कपारीत बसलेला, झेप घेण्यासाठी सज्ज असलेला बिबट्याही. ग्रामीण भारतातल्या विविध समुदायांच्या उपजीविकांचा मागोवा पारीवर घेतला जातो. मच्छीमारांपासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांचं जगणं इथे टिपलं जातं


पारीवर ग्रामीण भारतातले विविध समुदाय आणि त्यांच्या उपजीविकांचं वार्तांकन केलं जातं. सफाई कामगारांपासून ते मच्छिमारांपर्यंत सगळंच. डावीकडेः पी. इंद्रा मदुरई शहरात कसल्याही संरक्षक साहित्याशिवाय गटारं साफ करणाऱ्या आपल्या वडलांचा फोटो घेतो. उजवीकडेः तमिळनाडूच्या नागपट्टिणमच्या किनाऱ्यावर कोळंबी धरण्यासाठी टाकलेलं जाळं ओढणाऱ्या सक्तिवेल आणि विजय या आपल्या मच्छिमार बांधवांना कॅमेऱ्यात टिपलंय सुगंती मनिकवेलने
केवळ लेखांचा विचार केला तर पारीवर आज २,००० हून अधिक दीर्घ लेख आहेत आणि त्यातल्या अनेक लेखांना आणि लेखमालांना पुरस्कार मिळाले आहेत. आणि हा सगळा मजकूर पारीवर १५ भाषांमध्ये छापला जातो. असंख्य उपजीविका, विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेले पोटापाण्याचे उद्योग, वातावरणात होणारे बदल, जाती-आधारित, लिंगाधारित हिंसा आणि अन्याय, गीत-संगीत आणि काव्य आणि कॅमेऱ्याने टिपलेला विद्रोह तुम्हाला पारीवर पाहता येईल, ऐकता येईल.
आमचा पारी एज्युकेशन हा एक विशेष विभाग आहे आणि यावर विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी आणि मजकूर आम्ही प्रकाशित करतो. हा विभाग आणि हे काम फारच लोकप्रिय झालंय आणि अनेकानेक शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापिठांकडून या कामाला मागणी वाढत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांचा प्रतिसादही वाढतोय. किती ते मोजणं अवघड झालं आहे. नव्या पिढीशी दुवा साधण्याचं मोलाचं काम समाजमाध्यमातून होतं. पारीच्या इन्स्टाग्रामचे १,२०,००० फॉलोअर्स याची साक्ष देतात.
पारीवरती सर्जनशील अभिव्यक्तीचं खास स्थान आहे. मग ते शब्द असोत किंवा कला. या विभागात काही विलक्षण गोष्टी लिहिल्या, चितारल्या गेल्या आहेत. अगदी लोककवी आणि गायकांपासून ते अप्रतिम चित्रकारांची कला आणि साहित्य तुम्हाला इथे दिसेल. शिवाय आदिवासी मुलांच्या चित्रांचा अनोखा आणि कदाचित एकमेव असा संग्रहसुद्धा पारीवर आहे.
भारताच्या विविध प्रांतातली लोकगीतं आम्ही पारीवर सादर करतो. यातला आमच्याकडे सुपूर्द केलेला जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह एकमेवाद्वितिय आहे. आणि त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. आज भारतातल्या कुठल्याही वेबसाइटवर नसेल असा लोकसंगीताचा संग्रह पारीवर सर्वांसाठी खुला आहे.
गेल्या दहा वर्षांत पारीवर काही विलक्षण लेख, लेखमाला आणि फिल्म प्रकाशित झाल्या आहेत. कोविड-१९ च्या महासाथीच्या काळात आरोग्यसेवा, स्थलांतर हे विषय टिपत असतानाच लुप्त होत जाणाऱ्या उपजीविकांचाही आम्ही सातत्याने मागोवा घेत आहोत.
या दहा वर्षांमध्ये पारीला ८० पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. यामध्ये २२ पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत. यातल्या ७७ पुरस्कारांची माहिती आमच्या साइटवर तुम्हाला पहायला मिळेल. कारण तीन पुरस्कारांची घोषणा करण्याची परवानगी अजून आम्हाला मिळालेली नाही. ही संख्या पाहता पारीला दर ४५ दिवसांत एक पुरस्कार मिळाला आहे असं म्हणता येईल. मुख्य प्रवाहातली कोणतीही माध्यमं किंवा प्रकाशनं या कामगिरीच्या जवळपासही पोचू शकलेली नाहीत.


पारीवर शेतकरी आंदोलन आणि कृषी संकटाचं सखोल वार्तांकन करण्यात आलं आहे. डावीकडेः २०१८ साली दिल्लीमधल्या आंदोलनात किमान हमीभावाच्या कायदेशीर हक्काच्या मागणीसाठी रामलीला मैदानाच्या दिशेने निघालेले मध्य प्रदेशातले शेतकरी. देशातल्या कृषी संकटाच्या मुद्द्यावर संसदेचं एक विशेष सत्र घ्यावं ही त्यांची मुख्य मागणी होती. उजवीकडेः वीस वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशाच्या रायलसीमा प्रांतात सिनेमाच्या शूटिंगसाठी पुजारी लिंगण्णांना आपल्या शेतातली झाडं उपटून टाकावी लागायची. आज वीस वर्षांनंतर वातावरणातले बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे इथे वाळवंटीकरणाची प्रक्रिया वेगाने घडत आहे


आमच्या सर्जनशील लेखन आणि कला विभागामध्ये ओडिशाच्या लहानग्या आदिवासी मुलांची चित्रं आम्ही संग्रहित केली आहेत. डावीकडेः सहावीतला चित्रकार अंकुर नाईक म्हणतोः ‘आमच्या गावात एकदा हत्ती आणि माकडं आणली होती. ती पाहून मी हे चित्र काढलंय.’ उजवीकडेः आमच्या लेखांना किती तरी चित्रकारांनी त्यांच्या चित्रांचा साज चढवला आहे. लाबोनी जांगी हिचं चित्रः टाळेबंदीच्या काळात महामार्गावरून जाणारी एक स्त्री आणि तिचा भाचा
पीपल्स अर्काईव्ह किंवा लोकांनी स्वतः निर्मिलेला संग्रह का?
इतिहासात डोकावून पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. ती म्हणजे कोणतेही संग्रह किंवा पुरातन ग्रंथालयं ही ज्ञानाचं भांडार असली तरी ती सर्वांसाठी खुली नव्हती. शिक्षित वर्गांच्या पुरातन काळाबद्दलच्या भव्यदिव्य कल्पना काहीही असल्या तरी वास्तव हेच आहे. या जागा उच्चभ्रूंसाठी होत्या आणि सर्वसमावेशक नव्हत्या (आणि आजही अगदी हेच चित्र आहे). गंमतीचा भाग म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स या लोकप्रिय मालिकेमध्ये ही एक गोष्ट अगदी खरीखुरी दाखवली आहे. सामवेल टार्ली सगळी निषिद्ध पाठ्यपुस्तकं कुणाच्याही हाती लागू नयेत अशा एका खोलीत कुलुपबंद करण्यासाठी धडपडत असतो. पण हीच पुस्तकं आर्मी ऑफ डेडशी लढताना तारणहार ठरतात).
अलेक्झांड्रिया, नालंदा किंवा इतर ग्रंथालयं आणि संग्रहांची दारं साध्यासुध्या माणसांसाठी कधीही खुली नव्हती.
थोडक्यात काय तर अशी ग्रंथालयं आणि संग्रह म्हणजे सरकारसाठी संवेदनशील माहिती नियंत्रित आणि नियमित करण्याच्या आयत्या जागा होऊन जातात. आणि तिथे अर्थातच सामान्यजनांना प्रवेश नसतो. १९६२ साली, म्हणजे ६२ वर्षांपूर्वी भारत आणि चीनमध्ये कडवं युद्ध झालं. पण आज इतक्या वर्षांनंतरही त्या युद्धासंबंधीची कागदपत्रं कुणालाही पहायला मिळत नाहीत. अमेरिकेच्या सैन्यदलाकडून नागासाकीवरच्या बाँबहल्ल्याचं चित्रण मिळवण्यसाठी अनेक पत्रकारांना अनेक दशकं लढा द्यावा लागला होता. पेन्टेगॉनने ते चित्रण स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं. भविष्यातील अणुयुद्धामध्ये कसं लढायचं याचं अमेरिकी सेनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याचा वापर केला जात होता.
शिवाय अनेक सारे संग्रह ‘खाजगी संग्रह’ असतात. आणि अनेक ऑनलाइन ग्रंथालयं आणि संग्रह खाजगी मालकीचे असल्याने सर्वांना त्यावर प्रवेश मिळत नाही. अतिशय महत्त्वाची आणि लोकांच्या जगण्याशी निगडीत विविध प्रकारच्या माहितीपासून लोक वंचित राहतात.
आणि म्हणूनच एका खऱ्या अर्थाने लोकांच्या असलेल्या संग्रहाची गरज आहे. एसा एक संग्रह जो कोणत्याही सरकारच्या किंवा मंडळाच्या, कंपनीच्या मालकीचा नसेल. आणि अशा कुणाची हुजरी करणार नाही. इथे कुठल्याही नफ्याचा विचार न करता केली जाणारी पत्रकारिता असेल. आणि जी केवळ लोकांप्रती उत्तरदायी असेल. समाजाच्या आणि माध्यमांच्या परिघावर असलेल्यांसाठी कार्यरत असेल.
सध्याच्या माध्यमविश्वामध्ये टिकून राहणं वाटतं तितकं सोपं नाही. आमच्या पारी गोतावळ्यातले कुणी ना कुणी कायम काही नव्या कल्पना घेऊन येतात आणि त्या अनोख्या कल्पनांवर आम्हाला काम करावंच लागतं. आणि मग पुरेशी तयारी असो किंवा नसो, आम्ही ते काम हातात घेतो. अजून एका भाषेत अनुवाद आणि लिखाण करूया. किंवा मग भारतीयांच्या चेहऱ्यातलं वैविध्य टिपायचं का? देशातल्या जवळपास ८०० जिल्ह्यातल्या माणसांचे चेहरे टिपू या. जिल्हाच का, प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या माणसांपर्यंत पोचू या ना. असं सगळं सुरू असतं.
परिणामी आमच्या साइटवर देशभरातल्या अनेक तालुक्यातले ३,२३५ चेहरे तुम्हाला आमच्या साइटवर आज पहायला मिळतील आणि त्यात सातत्याने भरच पडत आहे. पारीवरती अगदी अनोखे ५२६ व्हिडिओ देखील आहेत.
चेहऱ्यांची दुनिया तर आहेच पण पारीवर अतिशय बोलकी २०,००० हून अधिक छायाचित्रं तुम्हाला पहायला मिळतील. (हा आकडाही अंदाज आहे, एकूण फोटो मोजणं हे मोठं काम आहे). आमची वेबसाइट एक दृश्य साइट आहे. फक्त वाचण्याची नाही. आज भारतातले काही आघाडीचे, उत्कृष्ट छायाचित्रकार आणि चित्रकार पारीसाठी काम करतायत.
पारी ग्रंथालय असंच एक अनोखं दालन आहे. इथे तुम्हाला कुठल्याही शुल्काशिवाय, नोंदणीशिवाय पुस्तकं मिळतात. आमच्या ग्रंथालयातली पुस्तकं, अहवाल तुम्ही वाचू शकता, डाउनलोड आणि प्रिंट देखील करू शकता.
बरंच काही करायचं आहे. भारतातल्या विणकरांवरच्या गोष्टींचा उत्तम संग्रह पारीवर तयार करुया. वातावरण बदलाच्या खऱ्याखुऱ्या गोष्टी सांगूया. आणि गोष्टीच बरं. अहवाल किंवा निबंध नाही. तसे अनेक शास्त्रीय, तांत्रिक अहवाल आमच्या ग्रंथालयात तुम्हाला वाचायला मिळतील. आणि फक्त अहवाल नाही तर त्याचा गोषवारा आणि ठळक मुद्देसुद्धा. ग्रंथालयात आज असे ९०० अहवाल आणि त्यासोबत त्यांचा गोषवारा आणि ठळक मुद्दे दिलेले आहेत. यामागे अनेकांचे अपार कष्ट आहेत हे सांगायला नको.


डावीकडेः पारी ग्रंथालयातील पुस्तकं आणि अहवाल सर्वांना मोफत वापरता येतात. उजवीकडेः चेहरे या विभागात भारतीयांच्या चेहऱ्यांचं वैविध्य टिपलं जातं
गेलं दशकभर आम्ही पाय रोवून आहोत हे तर मोठं यश आहेच पण आम्ही बहुभाषिक आहोत हे त्यापलिकडचं आणखी मोठं यश आम्ही मानतो. आज जगभराच पत्रकारितेच्या क्षेत्रात अशी एकही वेबसाइट नाही जिच्यावरचा सगळा मजकूर १५ भाषांमध्ये वाचायला मिळतो. बीबीसीसारख्या काही संस्था आहेत जिथे ४० भाषांमधला मजकूर तुम्हाला दिसेल पण या सगळ्या भाषा एका पातळीवर नाहीत. इंग्लिश वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या मजकुराचा अगदी थोडा अंश तुम्हाला तमिळमध्ये दिसेल. पारीवर मात्र एक मजकूर येतो तोच १५ भाषांमध्ये येतो म्हणजे येतोच. शिवाय आम्ही अधिकाधिक वार्ताहरांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत लिहिण्याचं आवाहन करतो. त्या मजकुराचं संपादन आमचे बहुभाषिक संपादक मूळ भाषेतच करतात.
अनुवादकांचा आमचा प्रचंड मोठा गट, भारतीय भाषांमध्ये काम करणारे आमचे सहकारी म्हणजेच आमच्या पारीभाषा गटाचा आम्हाला फार अभिमान आहे. त्यांचं काम किती आणि किती गुंतागुंतीचं आहे हे सांगणंसुद्धा कठीण आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये या गटाने पारीवर १६,००० अनुवाद प्रकाशित केले आहेत.
या सगळ्यापलिकडे जाणारा, एक मोठं आव्हान असणारा आमचा प्रकल्प म्हणजे अस्तंगत होऊ घातलेल्या भाषांच्या जतनाचा प्रकल्प. गेल्या ५० वर्षांमध्ये तब्बल २२५ भाषा विरून गेल्या आहेत. ज्या अगदी कडेलोटावर आहेत अशा भाषा नोंदवून ठेवणं, त्यांचं जतन करणं हे आमच्यासमोरचं फार मोठं आव्हान आहे आणि आम्ही ते अगदी आनंदाने करत आहोत.
गेल्या दहा वर्षांत आम्ही ३३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या ३८१ जिल्ह्यांमधून वार्तांकन केलं आहे. आणि हे करत असताना १४०० हून अधिकांचे हात त्याला लागले आहेत. यात वार्ताहर, लेखक, कवी, छायाचित्रकार, चित्रकर्ते, अनुवादक, चित्रकार, आणि विविध माध्यमांमधले संपादक तसंच पारीसोबत इंटर्न म्हणून काम करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


डावीकडेः अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी तसंच भारताचं भाषिक वैविध्य जपण्यासाठी पारीवर १५ भाषांमध्ये मजकूर प्रकाशित होतो. उजवीकडेः पारी ही फक्त वाचण्याची नाही तर पाहण्याची वेबसाइट आहे आणि आजवर आम्ही २०,००० हून अधिक छायाचित्रं पारीवर प्रकाशित केली आहेत
ज्या ज्या कामाचा मी अगदी ओझरता उल्लेख करतोय त्या कामांना लागणारा पैसा आमच्यापाशी अनेकदा नव्हता. तरीही आम्ही काम करत राहिलो. आपलं काम चांगलं असलं तर त्यासाठी आपल्याला लागणारा निधी थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला मिळेल असा विश्वास आमच्या मनात कायम होता. आणि आमचं काम चांगलं हे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पारीची स्थापना झाली त्या वर्षी आमचा वर्षाचा खर्च १२ लाख रुपये होता. आज तो ३ कोटींहून थोडा जास्त आहे. पण आम्ही जे काम करतोय त्याचं मूल्य यापेक्षा किती तरी पटीने जास्त आहे याचीही आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आपल्या देशासाठी आणि या देशातल्या प्रत्येकासाठी संग्रह म्हणून असलेलं त्याचं मोल अतुलनीय आहे.
ही दहा वर्षं आपलं अस्तित्व टिकवून राहणं हेच आमच्यासाठी फार मोठं होतं. पण गेल्या दहा वर्षांत ज्या गतीने आणि ज्या दर्जाचं काम आम्ही करतोय ते टिकवून ठेवण्यासाठी आणि ते आणखी मजबूत करण्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. आमच्या कामाची चौकट आणि मार्गदर्शक सूचनांनुसार कुणीही आमच्यासाठी लिहू शकतं, फिल्म बनवू शकतं, फोटो काढून पाठवू शकतं आणि गीत-संगीत रेकॉर्ड करू शकतं.
कोण जाणो, आजपासून २५ वर्षांनी किंवा पन्नास वर्षांनी जर कुणी मागे वळून भारतातली साधीसुधी माणसं कशी राहत होती, काय काम करत होती, काय बनवत होती, त्यांचं खाणं काय होतं, ती कोणती गाणी गात होती किंवा कोणत्या तालावर नाचत होती याचा मागोवा कुणी घेतला तर हे सगळं दाखवणारी पारी आणि फक्त पारी ही एकच वेबसाइट त्यांच्या संदर्भासाठी उपलब्ध असेल. २०२१ साली यूएस लायब्ररी ऑफ काँग्रेसने पारी हे एक मोलाचं संसाधन केंद्र असल्याची दखल घेतली आणि त्यांच्या संग्रहात आम्हाला समाविष्ट करण्याची परवानगी मागितली. आणि आम्ही ती अर्थातच आनंदाने देऊ केली.
पारीवर येण्यासाठी कोणतंही शुल्क द्यावं लागत नाही. हा बहुमाध्यमी डिजिटल अवकाश आहे जो सर्वांसाठी खुला आहे. आजघडीला घडत असलेल्या, आजच्या काळातल्या महत्त्वाच्या घडामोडी टिपत, त्यांचा मागोवा घेत पारी त्या नोंदवून ठेवत आहे. आणि आपल्या देशासाठी हे महत्त्वाचं संसाधन आहे. ते फक्त संसाधन न राहता तो एक राष्ट्रीय ठेवा होऊ शकतो. गरज आहे तुमच्या मदतीची. तुमच्या पाठिंब्याची.