संध्याकाळ उलटून गेलीये. तमिळनाडूच्या वदनमेल्ली गावात श्री पोन्नीअम्मन तेरुकूदु मंदरमचे लोक करिआक्कूदुच्या प्रयोगासाठी तयार होतायत. हा खेळ नेहमीच रात्रभर सादर केला जातो. किती तरी पात्रं आणि किती तरी वेशांतरं असतात त्याच्यात.
पडद्यामागे लगबग सुरू आहे. ३३
वर्षांच्या शर्मीने चेहरा रंगवायला सुरुवात केलीये. लाल रंगाची पूड आणि तेल कालवून
ती ओठ रंगवायला लागते आणि मेकअप किंवा अरिदारमचे काही साधे नियम सांगू लागते. “पुरुष
आणि स्त्रियांचा अरिथारम वेगवेगळा असतो. तसंच पात्र आणि त्याची भूमिका किती छोटी
किंवा मोठी आहे त्याप्रमाणेही त्यात बदल केला जातो.”
श्री पोन्नीअम्मन तेरुकूदु मंदरम ही
नाटक मंडळी तमिळनाडूचा सर्वात जुना मानला जाणारा कलाप्रकार सादर करते. शर्मी आणि
इतर तीन पारलिंगी कलाकार या १७ जणांच्या नाटक मंडळीत काम करतात. “माझ्या मागच्या
पिढीचे कलाकारही तेरुकूदु सादर करायचे,” शरमी सांगते. “किती जुनं नाटक आहे वगैरे
काही मला सांगता येणार नाही.”
तेरुकूदु हा पथनाट्याचा प्रकार आहे. यामध्ये
रामायण आणि महाभारतासारख्या महाकाव्यांमधल्या कथा आणि प्रसंग सादर केले जातात,
तेही अख्खी रात्रभर. तेरुकूदुचे खेळ शक्यतो पांगुनी (एप्रिल) ते पुरत्तस्सी
(सप्टेंबर) या काळात सादर केले जातात. शर्मी आणि तिचे सहकलाकार या काळात जवळपास
दररोज एक खेळ करतात. महिन्याला १५-२० होतातच. एका खेळाचे प्रत्येक कलाकाराला ७००-८००
रुपये मिळतात. म्हणजे महिन्याला १०,००० ते १५,००० रुपयांची कमाई होते.
पण हा काळ संपल्यानंतर या कलाकारांना कमाईचे पर्यायी स्रोत शोधण्यावाचून मार्ग
नसतो. तेरुकूदुचाच एक वेगळा प्रकार करियाक्कूदु मयतीनंतर सादर केला जातो. हे कलाकार
तो सादर करतात. “कुणाची मयत झाली तर मला आठवड्यातून दोन प्रयोग मिळतात,” शर्मी
सांगते. ही नाटक मंडळी तिरुवल्लुर जिल्ह्याच्या पट्टरायपेरुंबुदुर गावात आहे.
तिथून ६० किलोमीटरवर वदनमेल्लीमध्ये करियाक्कूदुची तयारी सुरू आहे.


वदनमेल्ली गावातल्या करियाक्कूदु प्रयोगासाठी शर्मी तयार होत आहे. हा तेरुक्कूदु या पथनाट्याचाच एक प्रकार आहे. रामायण, महाभारत अशा महाकाव्यांमधल्या कथा आणि प्रसंग यामध्ये सादर केले जातात. शर्मी गेल्या चार वर्षांपासून यामध्ये काम करू लागली आहे


एक लाल पूड तेलामध्ये कालवून ती ओठ रंगवते आणि अरिदारम किंवा मेकअपचे काही साधे नियम सांगू लागते. ‘स्त्रिया आणि पुरुषांचा अरिदारम वेगळा असतो. कोणतं पात्र आणि त्याची भूमिका किती छोटी किंवा मोठी आहे त्याप्रमाणेही बदल केला जातो’
कूदुसाठी सगळी तयारी झाली आहे. ज्या घरात मयत झाली आहे तिथे बाहेर मांडव टाकलाय आणि रस्त्यावर काळा कपडा अंथरलाय. गेलेल्या व्यक्तीची तसबीर घरासमोर ठेवण्यात आली आहे. समोर लावलेल्या दिव्याची वात थरथरते आणि ते प्रतिबिंब तसबिरीवर पडतं. रस्त्यावर ठेवलेली बाकडी, पातेली आणि टेबलं पाहून नंतर पंगत बसणार असल्यासारखं वाटतंय.
“सगळं गाव जेव्हा शांत होतं तेव्हा
आम्ही आमची वाद्यं जुळवायला सुरुवात करतो. तेव्हाच ती नीट सुरात लागली आहेत का
नाही ते समजतं. मेकअप सुद्धा तेव्हाच सुरू होतो,” शर्मी सांगते. रात्री १० वाजता
कूदुला सुरुवात होते. मुडी किंवा खेळात वापरल्या जाणाऱ्या मुकुटाला पूसइ किंवा
नैवेद्य़ दाखवला जातो आणि खेळ सुरू होतो. “पूसइ म्हणजे या खेळाचा मान आहे. हा खेळ
नीट पार पडू दे आणि सर्व कलाकार सही सलामत घरी पोचू देत अशी प्रार्थना आम्ही करतो,”
ती सांगते.
आज रात्री मिन्नळोली सिव पूजा हा खेळ
सादर केला जाणार आहे. महाभारतातल्या पांडवांपैकी अर्जुन आणि त्याच्या आठ बायकांची
ही कथा आहे. “मी आठही भूमिका करू शकते. आज मी बोगावदी सादर करणार आहे,” शर्मी
सांगते. आणि त्यासोबतच सगळी पात्रं आणि या कहाणीतली गुंतागुंत याबद्दल बरीच माहिती
देते.
मिन्नळोली (वीज) ही अर्जुनाची आठवी पत्नी. राजा मेगरासन (मेघराजा) आणि राणी
कोदिक्कलादेवीची मुलगी असलेल्या मिन्नळोलीचं वयाच्या पाचव्या वर्षीच अर्जुनाशी
लग्न होतं. वयात आल्यावर ती आपल्या आई-वडलांना त्याच्याविषयी विचारते. ४८ दिवस सिवपूसइ
(शिवाची पूजा) केल्यानंतरच अर्जुनाला भेटता येईल असं तिला सांगितलं जातं. मिन्नळोली
४७ दिवस अगदी नेमाने पूजा करते. ४८ व्या दिवशी तिची पूजा होण्याआधीच अर्जुन तिला
भेटायला येतो. ती त्याला भेटायचं टाळते आणि पूजा होईपर्यंत थांबण्याची विनंती
करते. पण अर्जुन ऐकतच नाही. त्यानंतर बरंच काय काय होतं. अखेर कृष्ण भगवान येतात व
अखेर मिन्नळोली व अर्जुनाचं मिलन होऊन ते सुखाने नांदू लागतात.


डावीकडेः खेळ रात्री १० वाजता सुरू होतो. सुरुवातीला मुडी किंवा नाटकामध्ये वापरल्या जाणाऱ्या मुकुटाला नैवेद्य दाखवला जातो. उजवीकडेः तेरुकूदु सादर करण्यासाठी सगळी तयारी पूर्ण झाली आहे
आता शर्मी माइ म्हणजेच काळ्या शाईने तिच्या ओठांच्या कडा रंगवते. “मी ओठांना माइ लावते ते पाहून बऱ्याच जणांनी तसं करायला सुरुवात केली आहे,” ती म्हणते. “मी अशी काही सजून येते कि लोक मी खरंच बाई आहे का असं मला विचारतात. मी सजून बाहेर जाते तेव्हा पुरुषांची नजर माझ्यावरून हटलीच नाही पाहिजे.”
शर्मीला मेकअप करण्याची इतकी जबरदस्त
आवड आहे की सहा महिन्यांपूर्वी तिने ब्युटिशियनचा कोर्स केला. “आधी [लिंगबदल
करण्याआधी] मला स्त्रियांचा मेकअप करू द्यायचे नाहीत.”
शर्मीला स्वतःचा अरिदारम पूर्ण
करण्यासाठी दीड तास लागतो. साडी नेसली की बोगावतीचा वेश पूर्ण होतो. “साडी कशी
नेसायची ते मला कुणीही शिकवलेलं नाही. माझी मीच शिकले. नाकाला, कानाला भोकंही माझी
मीच पाडली आहेत. सगळं काही स्वतःची स्वतः शिकले,” ती सांगते.
“ऑपरेशन तेवढं डॉक्टरांनी केलं. तेही
कसं करायचं माहीत असतं तर मीच केलं असतं. हॉस्पिटलमध्ये त्याच्यासाठी ५०,००० रुपये
खर्च करावे लागलेत मला,” वयाच्या २३ व्या वर्षी केलेल्या लिंगबदल
शस्त्रक्रियेबद्दल ती सांगते.
“साडी नेसणारी पारलिंगी स्त्री
लोकांना अजून सवयीची झाली नाहीये. इतर बाया कशा अगदी सहज साडी नेसून बाहेर पडू
शकतात, तसं आम्ही नाही करू शकत,” ती सांगते. मात्र तिच्या कामामुळे तिला इतर
पारलिंगी स्त्रियांसारखा छळ किंवा छेडछाड सहन करावी लागत नाही. “मी नाट्यकलाकार आहे म्हणून मला मान आहे.”


शर्मीला स्वतःचा मेकअप पूर्ण करायला दीड तास लागतो. ‘मी
ओठांना माइ लावते ते पाहून बऱ्याच जणांनी तसं करायला सुरुवात केली आहे,” ती म्हणते.
ती नाटकातल्या इतर पात्रांचा मेकअप करून द्यायला मदत करते


खेळ सुरू होण्याआधी पुरुष पात्रंही मेकअप करतात
*****
“मी तिरुवल्लुरच्या ईक्काड्डू गावची आहे,” आपला केसांचा टोप विंचरता विंचरता शर्मी सांगते. अगदी लहान असल्यापासून आपल्या गायला आणि नाटकातले संवाद म्हणायला आवडायचं असं ती सांगते. “मी लहान होते तेव्हाच नाटकाच्या प्रेमात पडले. नाटकातलं सगळंच मला आवडायचं, मेकअप, वेशभूषा... कधी काळी मी स्वतः एक नाट्यकलाकार होईन असं मात्र मला वाटलं नव्हतं.”
आपला अभिनयाचा
प्रवास ‘राजा रानी डान्स’मधून सुरू झाल्याचं शर्मी सांगते. यामध्ये नाच आणि
वाद्यांचा भन्नाट मेळ असतो. “त्यानंतर दहा एक वर्षं मी तेरूकूदुचे स्टेज शो केले.
यामध्ये नव्या गोष्टींचा वापर केलेला असतो. गेल्या चार वर्षांपासून मी थेरुकूदु
सादर करायला लागलीये.”
इतर पात्रांनी देखील आता अरिदारम
म्हणजेच मेकअप करायला सुरुवात केली आहे. शर्मी तिच्या आठवणींमध्ये रमलीये. “माझ्या
घरच्यांनी मला एक मुलगी म्हणूनच मोठं केलंय. आणि तेच अगदी स्वाभाविक होतं,” ती
सांगते. चौथीत असताना तिला आपण पारलिंगी आहोत अशी जाणीव व्हायला लागली. “मात्र
इतरांना याची जाणीव कशी करून द्यायची हे काही मला नीटसं समजत नव्हतं.”
आणि हे सोपं नव्हतं हे हळू हळू तिला
कळून चुकलं. शाळेत सगळे जण इतका त्रास द्यायचे की त्या छळाला कंटाळून तिने दहावीनंतर
शाळाच सोडून दिली. “त्या वेळेस तिरुडी तिरुडी नावाचा एक सिनेमा आला होता. वर्गातली
मुलं माझ्याभोवती गोळा व्हायची आणि त्यातल्या वंदरकुळली गाण्यातल्या ओळी म्हणून
मला त्रास द्यायची.” या लोकप्रिय गाण्यामध्ये पारलिंगी व्यक्तींबद्दल अश्लील उल्लेख
करण्यात आले आहेत. “त्यानंतर काही मी शाळेत गेले नाही.”
“[मी शाळेत जायचं का थांबवलंय हे] मी
माझ्या आई-वडलांना सांगूच शकले नाही. त्यांना ते समजण्यासारखं नव्हंत. म्हणून मी
काहीच बोलले नाही,” ती म्हणते. “मी अगदी किशोरवयातच घर सोडून पळून गेले आणि थेट १५
वर्षांनी परत आले.”
घरी परतणं अजिबात सोपं नव्हतं. मधल्या काळात तिचं लहनपणीचं घर पूर्णपणे
मोडकळीला आलं होतं. तिथे राहणंच शक्य नसल्याने तिला भाड्याने घर शोधावं लागलं. “मी
याच गावात लहानाची मोठी झाले पण आता भाड्याने घरच मिळत नव्हतं कारण आता मी एक
पारलिंगी आहे ना,” शर्मी सांगते. “त्यांना वाटतं आम्ही घरात धंदा करतो.” काही
काळानंतर तिला मुख्य गावापासून दूर एक भाड्याचं घर मिळालं.


‘मी लहान असतानाच नाटकाच्या प्रेमात पडले. मला सगळंच आवडायचं – मेकअप, वेशभूषा... पण एक दिवस मी नाट्य कलाकार होईन असं मात्र कधी वाटलं नव्हतं,’ शर्मी सांगते


‘घरच्यांनी मला मुलगी म्हणूनच लहानाचं मोठं केलं. तेच स्वाभाविक होतं,’ ती सांगते. शाळेतल्या त्रासाला कंटाळून दहावीनंतर शर्मीने शाळा सोडली. सध्या ती आपल्या आईबरोबर (उजवीकडे) राहते. तिची १० शेरडं आहेत. तेरुकूदुचे खेळ बंद असतात तेव्हा यातनंच थोडी फार कमाई होते
शर्मी आदि द्रविडार या दलित जातीची आहे. सध्या ती आपल्या ५७ वर्षीय आईबरोबर राहते. तिची १० शेरडं आहेत. तेरुकूदुचे खेळ बंद असतात तेव्हा यातनंच तिची थोडी फार कमाई होते.
“तेरुकूदु हे माझं एकमेव काम आहे.
आणि ते सन्मानाचं काम आहे. लोकांमध्ये असताना आपल्यालाही प्रतिष्ठा आहे ही भावना आनंददायी
असते,” ती म्हणते. “तेरुकूदु बंद असतात [ऑक्टोबर ते मार्च] तेव्हा शेरडं विकून
आम्ही पोट भरतो. मला पिचई [बाजार मागायला] किंवा धंदा करायला जायचंच नाहीये.”
शर्मीला नर्सिंग क्षेत्राची पण फार
आवड आहे. “माझ्या बकऱ्या आजारी असल्या की मीच त्यांना बरं करते. त्यांना पिल्लं होतात
तेव्हा मीच असते त्यांच्यासोबत,” ती सांगते. “पण मला व्यावसायिक नर्स काही होता यायचं
नाही.”
*****
खेळाची सुरुवात विदूषकाच्या कोट्यांनी आणि गाण्यांनी होते. त्यानंतर खेळाचा सूत्रधार असणारा पुरुष कलाकार रंगमंचावर येतो. मेगराजन आणि कोदिक्कलादेवी देखील आपली सुरुवातीची पदं सादर करतात आणि खेळ सुरू होत असल्याचं जाहीर करतात.


इथे मिनळ्लोली सिव पूजा हा खेळ सादर होतोय. महाभारतातील अर्जुन आणि त्याच्या आठ बायका अशी या खेळाची कहाणी आहे. शर्मी बोगावतीच्या भूमिकेत


शर्मी आणि इतर कलाकार खेळादरम्यान किमान १० वेळी वेशभूषा बदलतात आणि प्रेक्षकांना याचं खरंच अप्रूप वाटतं
विनोद, कोट्या, गाणी, शोक असं सगळं होत असल्यामुळे नाटकाची कथा झरझर पुढे सरकते. विदूषक असलेले मुनुसामी आपले संवाद आणि अंगविक्षेपांतून लोकांना चांगलंच हसवतात. अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत लोक हसतात. शर्मी आणि इतर कलाकार खेळादरम्यान किमान १० वेळी वेशभूषा बदलतात आणि प्रेक्षकांना याचं खरंच अप्रूप वाटतं. खेळाच्या मध्ये मध्ये चाबकाचे फटकारे मारले जातात. त्यामुळे रंगमंचावर सुरू असलेल्या कथानकात एकदम जान येते आणि समोरच्या प्रेक्षकांना पेंग येत असली तर तीही जाते.
पहाटे ३.३० च्या समुरास अर्जुनाने ‘तू
विधवेचं जिणं जगशील’ असा शाप दिलेली मिन्नळोली मंचावर येते. नाटकाचे लेखक रुबन ही
भूमिका करतात. त्यांनी म्हटलेलं ओप्पारी (शोकगीत) ऐकून प्रेक्षकांमधल्या अनेकांना
रडू फुटतं. गाणं सुरू असताना किती तरी जण रुबनच्या हातात पैसे सरकवतात. हा प्रसंग
संपल्यावर वातावरण जरा हलकं फुलकं करण्यासाठी विदूषक पुन्हा एकदा मंचावर येऊन जरा
हास्यविनोद करतो.
सूर्योदयाची वेळ झालीये. मिन्नलोली
आणि अर्जुनाचं नुकतंच मिलन झालंय. रुबन मयत झालेल्याची आठवण काढून त्यांचा आशीर्वाद
मागतो. त्यानंतर जमलेल्या प्रेक्षकांचे आभार मानून हा खेळ संपला असल्याचं जाहीर
केलं जातं. सकाळचे ६ वाजलेले असतात. प्रयोग संपतो.
कलाकारांची आवराआवर सुरू होते. सगळे थकले असले तरी खूश आहेत. काहीही संकट न
येता खेळ पार पडलाय. “कधी कधी लोक छेडतात. एकदा तर मी माझा फोन नंबर दिला नाही
म्हणून एकाने सुरा भोसकायचा प्रयत्न केला होता,” शर्मी सांगते. “आम्ही पारलिंगी स्त्रिया
आहोत हे जेव्हा त्यांना समजतं तेव्हा कधी कधी पुरुष लोक तुसड्यासारखं वागतात आणि
शरीरसंबंधांची मागणी करतात. आम्ही पण माणसंच आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही. अगदी
क्षणभर जरी त्यांनी आम्हाला काय काय अडचणींचा सामना करावा लागत असेल याचा विचार
केला ना, तरी ते असलं वागणार नाहीत आमच्याशी.”


खेळामध्ये हास्यविनोद आणि शोकगीतंही असतात. शर्मी कृष्णाचं पात्र करणाऱ्या गोबीबरोबरच्या एका प्रसंगात


रुबन (डावीकडे) मिन्नळोलीच्या भूमिकेत आणि अर्जुनाची भूमिका साकारणारा अप्पुन खेळाच्या अगदी शेवटच्या प्रसंगात. शर्मी (उजवीकडे) तेल लावून मेकअप उतरवतीये
अरिदारम म्हणजेच चेहऱ्यावरचा रंग उतरवणं काही सोपं काम नाही. तेल लावून कापडाने चेहरा स्वच्छ पुसून घ्यावा लागतो. “आम्हाला घरी पोचायला ९ किंवा १० वाजतात. किती लांबचा प्रवास आहे त्यावर सगळं असतं. घरी गेल्यावर स्वयंपाक करायचा, खायचं आणि आणि झोपायचं. दुपारी जाग आली की खाईन किंवा मग संध्याकाळपर्यंत ढाराढूर,” शर्मी सांगते. “कूदुच्या हंगामात रोज जरी खेळ असले ना तरी दमायला होत नाही. एरवीच जास्त थकायला होतं कारण दोन खेळांच्या मध्ये बराच काळ जातो.”
आराम करणं किंवा कमी खेळात काम करणं
परवडत नसल्याचं शर्मी सांगते. तेरुकूदुच्या कलाकारांना वाढत्या वयाचाही विचार
करावा लागतो. तरुण आणि धट्ट्याकट्ट्या कलाकारांना काम मिळण्याची संधी जास्त असते
कारण प्रत्येक खेळामागे ७००-८०० रुपये बिदागी मिळते. वय व्हायला लागलं की कामही
कमी मिळतं आणि पैसेही ४००-५०० वर येतात.
“नाट्य कलाकारांचं कसंय, आमचा चेहरा
सुंदर असतो आणि शरीरात ताकद असते तोपर्यंतच आम्हाला काम मिळतं,” शर्मी सांगते. “हे
सगळं आहे [रुप, मान, काम] तोपर्यंतच डोक्यावर छप्पर आणि पोटापाण्यासाठी काही तरी
व्यवसायाची सोय करावी लागणार आहे. आयुष्याची संध्याकाळ तेव्हा कुठे बरी जाईल!”
हे वार्तांकन मृणालिनी मुखर्जी
फौंडेशनच्या फेलोशिपद्वारे करण्यात आले आहे.