“दिवसेंदिवस याक प्राण्यांची संख्या कमी होत आहे,” पद्मा थुमो म्हणतात. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ याक पालन करणाऱ्या थुमो पुढे म्हणतात, “हल्ली खालच्या पठारावर (सुमारे ३,००० मीटर) फारच कमी याक दिसतात.”
झंस्कर खोऱ्यातील अबरान गावात पद्मा राहतात. लडाखच्या उंच आणि थंड पर्वतांमध्ये वर्षभरात सुमारे १२० जनावरं सोबत घेऊन त्या प्रवास करतात. इथं तापमान उणे १५ अंश सेल्सिअसच्या आसपास खाली येतं.
याक (बॉस ग्रुनिअन्स) थंड तापमानाशी सहज जुळवून घेतात. परंतु, १३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात तग धरून राहणं त्यांना कठीण जातं.
स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, गेल्या काही दशकांमध्ये झंस्कर खोऱ्यातील खालच्या पठारावर सध्या उन्हाळ्यातलं तापमान सरासरी २५ ते ३२ अंश सेल्सिअसच्या वर चाललं आहे. “हिवाळा आणि उन्हाळ्याच्या हंगामात तापमानात ही मोठी तफावत झाली”, खोऱ्या वाहनचालक असलेले तेनझिन एन., सांगतात.
या असामान्य उष्णतेमुळे याक प्राण्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. २०१२ ते २०१९ दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये (२० वी पशुधन गणना)निम्म्यावर आली आहे.

लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील अबरान गावातील पद्मा थुमो गेल्या तीस वर्षांपासून याक पाळतायत
चांगथांग पठारावर मोठ्या संख्येने याक पशुपालक आहेत त्यामानाने झंस्कर खोऱ्यात पशुपालकांची संख्या कमी आहे. झंस्करपा नावाने ओळखले जाणारे हे स्थानिक लोक सांगतात की, त्यांची संख्याही कमी झालीय. लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील अबरान, अक्षो आणि चाह गावातील काही कुटुंबांकडे अजूनही याकचे कळप आहेत.
नॉरफेल हे पशुपालक होते, पण २०१७ मध्ये त्यांनी याक विकून अबरान गावात हंगामी दुकान सुरू केलं. त्यांचं दुकान मे ते ऑक्टोबरपर्यंत सुरू असतं आणि इथं चहा, बिस्किटं, पाकिटबंद खाद्यपदार्थ, रॉकेल, भांडी, मसाले, गोडं तेल, सुके मांस यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू ते विकतात. ते सांगतात की, “पशुपालनाचं काम कंटाळवाणं आहे आणि उत्पन्नंही देत नाही. पूर्वी माझ्याकडंही याक होते, पण आता मी गायी चारतो. माझं बहुतांश उत्पन्न हंगामी दुकानातून येतं. कधीकधी एका महिन्याला ३ ते ४ हजार रुपये कमावतो, याक पालनातून मिळणाऱ्या कमाईपेक्षा हे जास्त आहेत.”
सोनम मोटप आणि त्सेरिंग अँग्मो हेदेखील अबरानचे आहेत, गेल्या काही दशकांपासून ते याक पशुपालन करतात. त्यांच्याकडे अंदाजे १२० याक जनावरं आहेत. “प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात (मे ते ऑक्टोबर) आम्ही खोऱ्यात (जेथे जास्त थंडी असते) स्थलांतर करतो आणि चार ते पाच महिने डोक्सामध्ये राहतो”, असे त्सेरिंग सांगतात.
डोक्सा म्हणजे अनेक खोल्या असलेली वस्ती. उन्हाळ्यात स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसाठी इथं स्वयंपाकघर असतं. याला गोथ किंवा मणी म्हणूनही ओळखलं जातं. सहज उपलब्ध होणाऱ्या चिखल आणि दगडांचा वापर करून डोक्सा बांधले जातात. खेड्यातील पशुपालक सामान्यतः कुटुंबातील सदस्यांसोबत डोक्सामध्ये राहतात. “मी प्राणी चारतो आणि त्यांची काळजी घेतो. इथे मी बऱ्यापैकी व्यस्त असतो”, सोनम म्हणतात.
या महिन्यांमध्ये, सोनम आणि त्सेरिंग यांचा दिवस पहाटे ३
वाजता चुरपी (स्थानिक चीज) बनवून सुरू होतो. ते चुरपी विकतात. “सूर्योदयानंतर, आम्ही कळप
चारायला घेऊन जातो आणि नंतर दुपारी विश्रांती घेतो”, असे
६९ वर्षीय सोनम सांगतात.


डावीकडेः सोनम मोटप दुपारच्या मोकळ्या वेळेत डोक्सामध्ये याक लोकर विणताना. उजवीकडेः गेल्या ४० वर्षांपासून सोबत असलेले सोनम आणि त्सेरिंग


त्सेरिंग अँग्मो (डावीकडे) तिच्या स्वयंपाकघरात. तिचा नवरा सोनम (उजवीकडे) आदल्या दिवशी गोळा केलेले दूध तापवतायत
त्सेरिंग म्हणतात, “येथील पशुपालक (झंस्कर खोरे) बहुतांशी मादी झोमोवर अवलंबून आहेत. नर झो आणि मादी झोमो ही याक आणि कोट्स यांच्या संकरातून जन्माला येतात. झो अप्रजननशील असतात. “आम्ही इथे नर याक फक्त प्रजननासाठी ठेवतो. आम्हाला झोमोपासून दूध मिळतं आणि त्यापासून आम्ही तूप, चुरपी बनवतो”, असंही ६५ वर्षीय त्सेरिंग पुढे सांगतात.
या जोडप्याचं म्हणणं आहे, की त्यांचं उत्पन्न गेल्या काही दशकात पूर्वीच्या तुलनेत एक तृतीयांश इतकं कमी झालं आहे. त्यांच्याप्रमाणेच अनेकांना या कामावर अवलंबून राहणं कठीण जात आहे. जेव्हा पारीची टीम त्यांना ऑगस्ट २०२३ मध्ये भेटली तेव्हा पशुपालकांना हिवाळ्याच्या महिन्यांत पुरेसा चारा मिळण्याची चिंता भासत होती. चाऱ्याचा पुरवठा पुरेशा पाण्यावर अवलंबून आहे, परंतु लडाखमधील शेतीला बर्फवृष्टी आणि हिमनद्या कमी झाल्याचा फटका बसलाय. इतक्या उंचावरच्या वाळवंटात पाण्याचा हा एकमेव स्रोत आहे.
अबरान गावाला अद्याप याचा फटका बसला नसला तरी सोनम चिंतेत आहेत. “हवामान बदललं आणि माझ्या जनावरांना पिण्यासाठी पुरेसं पाणी किंवा खायला गवत नसलं तर काय होईल याचा मी विचार करतो.”
सोनम आणि त्सेरिंग यांना पाच मुलं आहेत. २० ते ३० वयोगटातल्या मुलांनी या व्यवसायात न येता रोजंदारीवरील नोकऱ्यांना प्राधान्य दिलंय.
“तरुण पिढीचा पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवण्याऐवजी शहरी भागात स्थायिक होण्याकडे कल दिसतोय. त्यांच्यापैकी बहुतेकांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनसाठी वाहनचालक आणि मजूर म्हणून काम करायचंय”, असं सोनम म्हणतात.
“हा व्यवसाय आता शाश्वत राहिला नाही”, या मताशी पद्मा थुमो सहमत आहेत.

चांगथांग पठारावर मोठ्या संख्येने याक पशुपालक आहेत, त्यामानाने झंस्कर खोऱ्यात ही संख्या कमी आहे

उन्हाळ्यात स्थलांतरित झाल्यावर पशुपालक डोक्सामध्ये राहतात. जे गोथ आणि मणी म्हणूनही ओळखले जातात. आसपासची माती व दगडांचा वापर करून ते बांधले जातात

अबरान गावातील ६९ वर्षीय सोनम मोटप गेल्या काही दशकांपासून अंदाजे १२० याक पाळतायत

सोनम मोटप जनावरांचा कळप घेऊन चाऱ्याच्या शोधात चढण चढून जाताना

याक आणि झोमो वासरे उंच उंच गवताळ प्रदेशात चरतायत

स्थानिकांचं म्हणणं आहे, की इथे तापमानात मोठी तफावत असते, उन्हाळा विलक्षण गरम
असतो. याचा परिणाम याक पशुसंख्येवर झाला आहे. जी गेल्या दहा वर्षांत निम्म्यावर आली
आहे

याक पशुपालन करणारी ताशी डोल्मा,
तिचा मुलगा आणि भाचीसोबत जे लेह जिल्ह्यातील चुमाथांग इथे शिकतात

घरच्या मेंढ्यांच्या कळपाने वेढलेली
ताशी डोल्मा

याकचं शेण हा झंस्करमधील लोकांसाठी इंधनाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. हिवाळ्याच्या महिन्यांत ते स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरलं जातं

त्सेरिंग अँग्मो याकचे शेण गोळा करून घरी परततायत

येथील पशुपालक मुख्यतः झोमोवर अवलंबून आहेत, याक आणि कॉटच्या संकरातून झोमोची पैदास होते. झोमो दिवसातून दोनवेळा दूध देते, सकाळी आणि संध्याकाळी. या दूधाचा वापर तूप आणि चुरपी (स्थानिक चीज) तयार करण्यासाठी केला जातो

याक आणि झोमोंना दोहण्याआधी पशुपालक दुपारच्या वेळी थोडी विश्रांती घेतात

चुरपी बनवण्यासाठी ताजं दूध
उकळलं जातं. हे चीज याकच्या आंबवलेल्या दूधापासून बनवलं जातं

स्त्रिया दूध घुसळून त्यापासून
तूप आणि चुरपी बनवतात आणि नंतर ते विकतात

हिवाळ्यात पशुपालक त्यांच्या जनावरांसह गावी परत जातात. हिवाळ्यात इंधन म्हणून
कोरड्या शेण्यांचा वापर केला जातो. अशा शेण्या पशुपालक गाडीत भरतायत
![Padma Thumo says the population of yaks in the Zanskar valley is decreasing: 'very few yaks can be seen in the lower plateau [around 3,000 metres] nowadays'](/media/images/20-DSC_7814-RM-Zanskars_yak_herders_are_fe.max-1400x1120.jpg)
पद्मा थुमो सांगतात, की झंस्कर
खोऱ्यात याक प्राण्यांची संख्या कमी होत आहे, ‘आजकाल खालच्या पठारावर (सुमारे ३०००
मीटर) फार कमी याक दिसतात'