“आओ आओ, सुनो अपनी भविष्यवाणी, सुनो अपनी आगे की कहानी...” जुहू बीचच्या संध्याकाळच्या सगळ्या गोंगाटात ही साद एखाद्या मंत्रासारखी हवेत भरून राहलेली असते. मुंबईच्या समुद्रावर सूर्य मावळत असताना २७ वर्षीय उदय कुमार लोकांना बोलावतोय आणि त्यांच्याच भल्याचं काही सांगतो म्हणतोय.
तो काही कुणी ज्योतिषी नाही, ना चिरो
प्रॅक्टिशनर. त्याच्याकडे टॅरट कार्ड नाहीत आणि लाल कंठा असलेला पोपटही नाही
आसपास. त्याच्याकडे आहे एक छोटासा, फूटभर उंचीचा रोबो. फोल्डिंग टेबलावर एका
काळ्या खोक्यावर रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलेला रोबो. “त्याचं नाव आहे ज्योतिष
कंप्यूटर लाइव्ह स्टोरी,” उदय कुमार रोबोची ओळख मला करून देतो.
या यंत्राला कुणाच्याही शरीरातलं
कंपन समजतं असं सांगत आलेल्या एकाला तो त्याच्याकडचा हेडफोन देतो. आलेल्या
माणसाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसतं. काही क्षण गेल्यानंतर एका बाईचा
आवाज हिंदीमध्ये त्या व्यक्तीची भविष्यवाणी सागंतो. फक्त ३० रुपयांत.
असा रोबो असणारा उदय हा इथला एकटाच
आपले काका राम चंदर यांच्याकडून त्याला हा रोबो वारशात मिळाला आहे. काही
दशकांपूर्वी ते बिहारच्या गेंधा या पाड्यावरून मुंबईला स्थलांतरित झाले. इथे शहरात
त्यांना सगळे राजू म्हणून ओळखतात. काका गावी आले की शहरातल्या अनेक सुरस कथा
सांगायचे. “चाचांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक अजूबा आहे आणि तो भविष्य सांगतो.
त्यातनंच त्यांची कमाई होत असल्याचं ते म्हणाले. बहुतेकांनी हे सगळं हसण्यावारी
नेलं आणि म्हणाले काही तरी विनोद करतोय म्हणून. पण मला मात्र त्या सगळ्याची भुरळ
पडली होती!” उदय सांगतो. राजूच्या कहाण्यांमुळे त्याच्या ११ वर्षांच्या पुतण्यावर
मुंबई या महानगरीची आणि त्या अजूबाची जादू झाली होती.


‘ज्योतिष कंप्यूटर लाइव्ह स्टोरी’ असं नाव असलेल्या आपल्या या रोबोबरोबर उदय कुमार मुंबईच्या बीचवर
उदयचे आई-वडील आपल्या मालकीची काही बिघा जमीन कसत होते. पैशाची कायमच चणचण असायची. त्यामुळे चौथीनंतर उदयने शाळा सोडून दिली. चार पैसे कमवून आपल्या घरच्यांना जरा हातभार लावावा असा विचार करत उदयने बिहारच्या वैशाली जिल्ह्यातलं आपलं गाव सोडून राजू चाचा बरोबर मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. नुकतंच मिसरुड फुटलं असेल तेव्हा. “वो मशीन देखना था और मुंबई भी!” तेव्हाच्या आठवणीत काही क्षण उदय रमून जातो.
त्याच्या काकाकडे असलेला हा रोबो
चेन्नई आणि केरळमधल्या काही कारागिरांनी तयार केलेला होता. नव्वदचं दशक पार होता
होता मुंबईमध्ये हा रोबो दाखल झाला होता. राजू चाचाची गाठ त्यातल्याच एका कारागिराशी
पडली आणि त्याने भाड्यावर तो रोबो घेतला.
“या कामात तेव्हा २०-२५ लोक असतील,”
उदय सांगतो. “बहुतेक जण दक्षिणेकडचे होते. काही जण बिहार आणि उत्तर प्रदेशातले.
सगळ्यांकडे हा असाच रोबो होता.”
राजूसारखे हे सगळेही या अजब यंत्रासोबत मुंबईत फिरायचे. जुहू बीच ही खास जागा
होती. आपल्या चाचा बरोबर उदयसुद्धा शहराच्या गल्लीबोळातून हिंडत फिरत होता.
कमाईतला चौथा हिस्सा या रोबोच्या भाड्यावर खर्च होत होता. पण ते विकत घेणं काही
सहज शक्य नव्हतं. हे काम सुरू केलं तेव्हा या रोबोची किंमत ४०,००० रुपये होती.
कालांतराने राजू चाचाने हा रोबो विकत घेतला.


उदय मुंबईच्या गल्लीबोळांमधून हा रोबो घेऊन हिंडतो पण जुहू बीच ही आजही त्याच्यासाठी खास जागा आहे
हा रोबो बनवण्याची भरपूर खटपट केल्यानंतरही उदयला काही तो बनवता आलेला नाही. काही वर्षांपूर्वी राजू चाचा वारला, त्यानंतर भविष्यवाणी करणारा हा रोबो त्याच्याकडे आला. कधी काळी आपल्याला ज्याने भुरळ घातली तो रोबो आता आपल्याकडे आहे आणि आपण एक परंपरा पुढे नेत आहोत अशीच उदयची भावना आहे.
दहा वर्षांपूर्वी आपलं भविष्य जाणून
घेण्यासाठी लोक २० रुपये देत असत. गेल्या चार वर्षांत भविष्यही महाग झालंय आणि आता
त्यासाठी ३० रुपये मोजावे लागतायत. २०२० साली करोनाची महासाथ आली आणि धंदा ठप्प
झाला. “मग काय बऱ्याच लोकांनी नंतर हे कामच बंद केलं,” उदय सांगतो. आता हा अजूबा केवळ
उदयकडेच आहे.
पण त्याच्या जोरावर मिळणाऱ्या पैशात फारसं
काही भागत नसल्याचं उदयचं म्हणणं आहे. त्याची पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा गावी
असतात. लेकाला शिक्षणासाठी मुंबईला घेऊन यायचं उदयच्या डोक्यात आहे. त्यामुळे सकाळच्या
वेळात तो बरीच छोटी-मोठी कामं करत असतो. पत्रकं विकायची, काही टायपिंग किंवा कारकुनी
कामं. मिळेल ते काम करण्याची तयारी असते. “सकाळी जर काही काम मिळालं नाही तरी मी
माझा रोबो घेऊन इथे उभा राहतो आणि त्यातून जी काही कमाई होईल ती माझ्या घरी पाठवतो,”
उदय सांगतो.
उदय जुहूच्या किनाऱ्यावर दुपारी चार ते अगदी मध्यरात्रीपर्यंत आपला रोबो घेऊन
उभा असतो. इतर कुठे थांबलं तर आपल्याला दंड होईल आणि मग आपलं हे यंत्र कुठे घेऊन
जाणं मुश्किल होईल अशी भीती त्याच्या मनात आहे. धंद्यासाठी सगळ्यात उत्तम दिवस
म्हणजे शनिवार आणि रविवार. कारण एरवीपेक्षा या दोन दिवशी आपलं भविष्य जाणून
घेणाऱ्यांची गर्दी जास्त असते. या दोन दिवसांना त्याची कमाई अगदी रोज ३०० ते ५००
रुपये इतकी होऊ शकते. सगळे मिळून महिन्याला ७,००० ते १०,००० रुपये. बस्स.


उदय कुमारला त्याच्या काकाकडून हा रोबो वारशात मिळाला आहे. मुंबई महानगरी आणि या यंत्राची भुरळ अशी होती की उदय अगदी किशोरवयात इथे दाखल झाला
“ गावी लोकांचा ज्योतिषांवर विश्वास असतो, यंत्रांवर नाही. त्यामुळे तिथे काही हे चालत नाही ,” उदय सांगतो. आपल्या गावातल्या इतरांना या रोबोची जादुई शक्ती पटवून देण्यात आपण अपयशी ठरल्याचं तो म्हणतो. त्याच्या मते, या धंद्यासाठी मुंबई हीच योग्य जागा आहे. खरं तर लोकांना या रोबोची मजा जास्त वाटते. त्याच्या भविष्यवाणीविषयी ते साशंकच असतात.
“काहींनी गंमत वाटते आणि ते हसतात.
काहींना जरा धक्काच बसतो. मध्यंतरी एकाचा बिलकुल विश्वास बसत नव्हता आणि तो हसत
होता. पण त्याच्या मित्राने त्याला भविष्यवाणी ऐकायला लावली आणि मग मात्र त्याला कौतुक
वाटत होतं. त्याने सांगितलं की त्याला पोटाचा काही तरी त्रास होता आणि रोबोला हे
बरोबर समजलं आणि त्याने काळजी करू नको असं सांगितलं त्याला. आणि खरंच त्याला पोटाचा
त्रास होता. असे किती तरी जण मला भेटलेत आजवर,” उदय सांगतो. “ज्यांना विश्वास ठेवायचाय
ते ठेवूच शकतात.”
“आजवर एकदाही त्याचं काही चुकलं
नाहीये,” उदय सांगतो. आपल्या रोबोच्या अद्भुत शक्तीविषयीचा अभिमान त्याच्या
आवाजातून जाणवर राहतो.
कधी बंद पडलाय का तो?
जर बंद पडलाच तर त्याचं वायरिंग
वगैरे ठीक करणारा एक मेकॅनिक आहे, उदय सांगतो.
“तो जे काही सांगतो त्यावर माझा विश्वास आहे. माझं हे काम असंच पुढे सुरू ठेवायचंय
ही आशा त्याच्यामुळेच टिकून आहे,” उदय सांगतो. आपलं भविष्य त्याच्या या ज्योतिषी
रोबोने काय सांगितलंय हे मात्र तो सांगत नाही. “त्याच्या आत एक जादू आहे. त्यामुळे
माझ्याबद्दल तो जे काही सांगतो ते ऐकून मी चक्रावून जातो. तुम्ही विश्वास ठेवा असं
मी सांगणार नाही. पण स्वतः ऐका आणि मग ठरवा,” हसत हसत उदय म्हणतो.

भविष्यवाणी करणाऱ्या या यंत्राची लोकांना गंमत वाटते त्याच्या भविष्याबद्दल बरेच साशंक असतात

‘गावी लोकांचा ज्योतिषांवर विश्वास असतो, यंत्रांवर नाही. त्यामुळे तिथे काही हे चालत नाही,’ उदय सांगतो. या धंद्यासाठी मुंबईच योग्य जागा आहे

रोबोचं बोलणं आणि उच्चार काहींना मजेशीर वाटतात, काहींना त्याची भविष्यवाणी ऐकून धक्का बसतो, उदय सांगतो. पण त्याचं कधीही काही चुकत नाही

रोबोतून होणारी कमाई जगण्यासाठी पुरेशी नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेत उदय छोटी-मोठी कामं करतो आणि संध्याकाळी रोबो घेऊन बीचवर येतो

३० रुपयांमध्ये भविष्य जाणून घेण्याची संधी घेणारा एक गिऱ्हाईक

करोनाची महासाथ आली आणि हा धंदा ठप्प झाला पण उदयने मात्र त्यानंतरही हा व्यवसाय सुरू ठेवला आहे

आपल्याबद्दल हा रोबो काय सांगतो ते ऐकून उदयसुद्धा आश्चर्यचकित होतो. ‘माझा विश्वास आहे त्याच्यावर,’ तो म्हणतो