येळिल अण्णांची आठवण मनात दाटून येते आणि भारल्यासारखा मी त्या आठवणींच्या मागे खेचला जातो. गाणाऱ्या सावल्यांची रंगीबेरंगी वनं, नाचणारी उंचच्या उंच झाडं, जिप्सी राजांच्या सुरस कहाण्या आणि पर्वताची शिखरं. तिथून सगळं जगच स्वप्नवत भासू लागतं. आणि मग अचानक अण्णा मला रात्रीच्या गारव्यात आकाशातल्या चांदण्याने नटलेल्या आकाशात नेऊन सोडतात. किंवा मग मातीत इतका खोल की मीच माती होऊन जावं.
ते स्वतः मातीचेच तर बनले होते. आणि त्यांचं आयुष्यसुद्धा. एक विदूषक, शिक्षक, लहान मूल, नट – मातीच्या गोळ्यासारखं ते कोणताही आकार घेऊ शकायचे. येळिल अण्णांनी मलाही मातीतूनच घडवलं.
लहान मुलांना ते राजांच्या गोष्टी सांगायचे, त्या ऐकत मी मोठा झालो. पण आज मला त्यांची गोष्ट सांगायचीये. एका माणसाची आणि त्याच्या छायाचित्रांमागची कहाणी. गेली पाच वर्षं ही गोष्ट माझ्या मनात, माझ्या आत सुप्त होती.
*****
आर. येळिलअरसन म्हणजे विदूषकांचा राजा, इकडून तिकडे उड्या मारणारा उंदीर, कपाळावर आठ्या असलेल्या रंगीबेरंगी पक्षी, दुष्ट नसलेला लांडगा किंवा झडप घालणारा सिंह. त्या दिवशी जी गोष्ट, तेच अण्णांचं रुप. तमिळ नाडूच्या शहरांमधून, रानावनांतून आपल्या पाठीवरच्या हिरव्या पोतडीत गेली तीस वर्षं हा माणूस या सगळ्या गोष्टी घेऊन फिरतोय.
२०१८. आम्ही नागपट्टिणमच्या एका सरकारी शाळेच्या आवारात होतो. गजा चक्रीवादळात उखडून, उन्मळून पडलेल्या झाडांचे कापलेले ओंडके इतस्ततः पसरलेले. आणि त्यामुळे शाळा अगदी एखाद्या बंद पडलेल्या वखारीसारखी दिसत होती. वादळाचा सगळ्यात जास्त फटका बसलेल्या नागपट्टिणम जिल्ह्यातल्या या शाळेच्या एका कोपऱ्यात मात्र मुलांच्या हसण्याची कारंजी उडत होती आणि शाळेला आलेली अवकळा हळूहळू उतरत होती.
வந்தானே தென்ன பாருங்க கட்டிfயக்காரன் ஆமா கட்டியக்காரன்
வாரானே தென்ன பாருங்க .......
“वंदाणे देन्न पारंगं कट्टियक्कारण आमा कट्टियकारण.
वारणे देन्न पारंगं [बघा, विदूषक आलाय, खरंच विदूषक येतोय, बघा]”

येळिल अण्णा नाटकाची तयारी सुरू करण्याआधी मुलांबरोबर बसतात आणि त्यांना काय काय आवडतं ते विचारून घेतात

२०१८ साली आलेल्या गजा चक्रीवादळानंतर नागपट्टिणममध्ये त्यांनी एक कला शिबिर घेतलं आणि मग रिकाम्या वर्गखोल्या परत एकदा मुलांनी आणि हास्याने भरून गेल्या
चेहरा पिवळा आणि पांढऱ्या रंगाने रंगवलेला, तीन लाल गोळे – एक नाकावर आणि दोन गालांवर दोन, विदूषकाच्या टोपीसाठी आज निळ्या प्लास्टिकची पिशवी डोक्यावर घातलेली, ओठावर कुठलं तरी मजेशीर गाणं आणि अंगात मुक्त लय – त्यांना पाहून कुणीही खिदळू लागावं. आणि हे सगळं अगदी नित्याचं आहे. येळिल अण्णांचं कला शिबिर सुरू होतं ते असं. जव्वादच्या टेकडीवरची सरकारी शाळा असो किंवा चेन्नई शहरातली एखादी झकपक खाजगी शाळा. सत्यमंगलमच्या जंगलात आदिवासींच्या शाळेत किंवा विशेष मुलांच्या, अण्णा एकदम गायलाच लागतात, किंवा एखादं छोटंसं नाटुकलं सादर करतात. मग काय, मुलांची भीती, लाज सगळं एका क्षणात गुल आणि मुलं पळतात, खिदळतात आणि सोबत गायला लागतात.
प्रशिक्षित कलाकार असलेल्या अण्णांना शाळेत काय काय सुविधा आहेत याची बिलकुल फिकीर नसते. ते कशाचीच मागणी करत नाहीत. राहण्यासाठी वेगळ्या हॉटेलमध्ये किंवा वेगळी काही सोय किंवा विशेष काही साहित्यसुद्धा नाही. वीज, पाणी किंवा भारी कागद-रंग इत्यादी काहीही नसलं तरी ते काम करतात. त्यांना फक्त मुलं हवीत, त्यांना भेटून, त्यांच्याशी संवाद साधत, त्यांच्या बरोबर ते काम करतात. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. त्यांच्या आयुष्यातून तुम्ही मुलं वेगळी काढू शकत नाही. मुलांच्या संगतीत असले की एकदम वेगळे, राजबिंडे दिसायला लागतात.
सत्यमंगलममधल्या एका गावात ते काही मुलांबरोबर एकदा शिबिर घेत होते. या मुलांनी या आधी कधी रंगच पाहिले नव्हते. त्यांनी पहिल्यांदा या मुलांना रंग वापरून स्वतःच्या कल्पनेतलं काही तरी करायला शिकवलं. या मुलांसाठी हा अगदी आगळा अनुभव होता. आणि गेली २२ वर्षं, कलिमन विरलगल [मातीची बोटं] ही आपली कला शाळा सुरू केल्यापासून ते असंख्य मुलांना असेच अनुभव देतायत. आजारी आहेत म्हणून बसून राहिलेत असं अण्णांच्या बाबतीत कधीच झालेलं नाही. आजारपणावरचा रामबाण उपाय म्हणजे मुलांसोबत काम. त्यासाठी ते कधीही अगदी एका पायावर तयार.
तीस वर्षांपूर्वी, १९९२ साली अण्णांनी चेन्नई फाइन आर्ट्स कॉलेजमधून फाइन आर्टस या विषयातली पदवी घेतली. “माझ्या वरच्या वर्गात असलेले विद्यार्थी म्हणजे, चित्रकार, तिरु तमिलसेल्वन,” ते सांगतात, “वेशभूषाकार, श्री. प्रभाकरन, चित्रकार श्री. राजमोहन ज्यांनी कॉलेजच्या काळात कायम माझ्या पाठीशी उभे होते. पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला खूप मदत केलीये. टेराकोटा शिल्पकलेतला एक कोर्स पूर्ण केल्यानंतर मी कलाविषयक कामांमध्ये काही करून पहावं यासाठी चेन्नईच्या ललित कला अकादमीत प्रवेश घेतला.” स्वतःच्या मूर्तीशाळेतही काही वर्षं त्यांनी काम केलं.
“मी केलेल्या वस्तू विकल्या जायल्या लागल्या. पण माझ्या लक्षात आलं की त्या सामान्य माणसापर्यंत काही पोचत नाहीयेत. तेव्हाच मी ठरवलं की साध्यासुध्या माणसांसोबत कलेचे प्रयोग करायचे. आणि तमिळ नाडूचे पंचप्रदेश [डोंगर, समुद्रकिनारे, वाळवंटं, जंगल आणि पठारं] हीच माझी कर्मभूमी असेल. मग मी माझ्या मुलांसोबत मातीची खेळणी आणि इतर काही वस्तू बनवायला सुरुवात केली.” त्यांनी मुलांना अनेक गोष्टी शिकवल्या – कागदी मुखवटे, मातीचे मुखवटे, मातीच्या वस्तू, रेखाटनं, चित्रं, काचेवरचं रंगकाम आणि ओरिगामी.


डावीकडेः इरोड जिल्ह्याच्या सत्यमंगलममधल्या मुलांनी रंगांची जादू अगदी पहिल्यांदा अनुभवली . उजवीकडेः कृष्णगिरी जिल्ह्याच्या कावेरीपट्टिणममध्ये पुठ्ठा आणि वर्तमानपत्राचा कागद वापरून हरणाच्या शिंगांचा मुकुट तयार होतोय


डावीकडेः कावेरीपट्टिणममधल्या कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी मुलांनी नाटक सादर केलं आणि त्यासाठी स्वतःच्या कल्पनेतून बनवलेले विविध प्रकारचे मुकुट परिधान केले . उजवीकडेः पेरांबलुरमधली मुलं त्यांनी बनवलेले मातीचे मुखवटे घेऊन , प्रत्येक मुखवट्याचा भाव वेगवेगळा आहे
आम्ही कधीही, कुठल्याही वाहनाने प्रवास करत असलो – बस, व्हॅन किंवा जे काही मिळेल ते – तरी आमचं सगळ्यात जास्त सामान असतं मुलांसाठी घेतलेल्या वस्तू आणि गोष्टी. येळिल अण्णांच्या भल्या मोठ्या हिरव्या पोतडीत चित्र काढण्यासाठीचे बोर्ड, रंगकामाचे कुंचले, रंग, फेविकॉलच्या ट्यूब, ब्राउन बोर्ड, काचेवर चालणारे रंग, कागद आणि इतरही असंख्य गोष्टी तुडुंब भरलेल्या असतात. चेन्नईच्या सगळ्या कानाकोपऱ्यात, ट्रिप्लिकेन ते एग्मोर, जिथे जिथे कलासाहित्याचं दुकान असेल तिथे ते आम्हाला घेऊन गेलेले असतात. आमच्या पायाचे अगदी तुकडे पडायची वेळ आलेली असते आणि बिलाचा आकडा सहा-सात हजारांच्या वर गेलेला असतो.
अण्णांकडे पुरेसा पैसा कधीच नसायचा. ते मित्रमंडळींकडून, छोटीमोठी कामं करत, खाजगी शाळांमधल्या त्यांच्या शिबिरांमधून पैसा उभा करायचे. का तर आदिवासी किंवा अपंगत्व असलेल्या मुलांसाठी विनाशुल्क शिबिरं करता यावीत म्हणून. गेली पाच वर्षं मी येळिल अण्णांसोबत फिरलोय. जगण्याची त्यांची असोशी तसूभरही कमी झालेली मी पाहिली नाहीये. आपल्या स्वतःसाठी पैसे मागे टाकावे असा विचार त्यांनी कधीच केला नाही. तसंही मागे टाकण्यासाठी त्यांच्याकडे काही उरलेलंही नसायचंच म्हणा. त्यांची जी काही कमाई व्हायची ती ते माझ्यासारख्या सह-कलाकारांमध्ये वाटून टाकायचे.
शिक्षण व्यवस्था जे काही शिकवू शकत नाही, ते सगळं अण्णांना मुलांना शिकवायचं असायचं. आणि मग त्यासाठी ते कधी कधी काहीही विकत न घेता नवनव्या साहित्याचा शोध लावायचे. आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या गोष्टींमधून कलावस्तू तयार करायला सांगायचे. माती तर अगदी सहज मिळते, त्यामुळे ते तिचा कायम वापर करत असत. पण माती तयार करण्याचं काम मात्र ते स्वतः करायचे. त्यातला गाळ, काडीकचरा, खडे वेचून काढून टाकायचे, ढेकळं फोडून, माती भिजवून, चाळून सुकवून मग ती वापरासाठी तयार करायचे. माती पाहिली की मला ते आणि त्यांचं आयुष्यच आठवतं. मुलांमध्ये गुंफलेलं, देऊ तसा आकार घेणारं. मुलांना ते मुखवटे करायला शिकवतात ना ते तर प्रत्येकानं पहावंच. प्रत्येक मुखवट्यावर अगदी आगळा भाव असायचा. दुसऱ्या कोणत्याच मुखवट्यावर तो तुम्हाला सापडणार नाही. पण झाडून सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर मात्र अगदी निखळ आनंद.

माती पाहिली की मला येळिल अण्णा आणि मुलांसह गुंफलेलं त्यांचं आयुष्य डोळ्यासमोर येतं . ते स्वतःही मातीसारखेच आहेत , देऊ तो आकार घेणारे . मुलांना मातीचे मुखवटे कसे करायचे हे शिकवताना त्यांना पाहणं हा एक सोहळा असतो . नागपट्टिणममधल्या शाळेतला असाच एक प्रसंग

मुलं जेव्हा काही तरी तयार करतात तेव्हा अण्णा त्यांना स्वतःच्या आयुष्यात डोकावून त्यातल्या कल्पना आणि दृश्यांचा विचार करायला सांगतात . सत्यमंगलममधल्या या मुलानेच पहा कसा सोंड उंचावलेला हत्ती बनवलाय कारण त्याने तसाच हत्ती पाहिलाय
कला शिबिरांसाठी काय साहित्य वापरायचं या बाबतीत ते कायम दक्ष असायचे. सगळ्या गोष्टी एकदम बिनचूक करायच्या, मुलांना योग्य ते साहित्य मिळावं यासाठी त्यांची धडपड आम्ही पहायचो. आणि त्यामुळे ते आमच्यासाठी अगदी हिरो होते. शिबिरात प्रत्येक दिवशी रात्रीच्या वेळेत येळिल अण्णा आणि बाकीचे सगळे मिळून दुसऱ्या दिवसासाठी लागणाऱ्या वस्तू आणि साहित्य तयार करायचे. दृष्टीहीन मुलांसोबत शिबिर असायचं तेव्हा आधी ते स्वतःचे डोळे बांधायचे आणि त्यांच्याशी कसा संवाद साधता येईल याचा सराव करायचे. तेच कर्णबधिर मुलांच्या बाबतीत. कानात बोळे घालून ते आवाज बंद करून टाकायचे. ज्यांच्यासोबत काम करायचं त्या मुलांचे अनुभव स्वतः अनुभवून बघण्याची त्यांची धडपड पाहूनच मीही किती तरी शिकलो. ज्यांची छायाचित्रं काढतो त्यांच्या जगण्याशी भिडायला लागलो. फोटो काढण्याआधी त्यांच्याशी दुवा जोडायला शिकलो.
येळिल अण्णांना फुग्यांमधली जादू समजली होती. ते फुगे घेऊन जे काही खेळ करायचे त्यातून छोट्या मुला-मुलींमध्ये मिसळून जाता यायचं. त्यांच्या पोतडीत चिक्कार फुगे भरलेले असायचे – मोठे गोल, लांबुळके सापासारखे काही, मुडपता येणारे, शिट्टीवाले आणि पाण्याचे. ते फुगे पाहून मुलं अगदी चेकाळायची. आणि मग सुरू व्हायची गाणी.
“माझं काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की मुलांना सतत गाणी आणि खेळ हवे असतात. मग मी अशी गाणी किंवा खेळ तयार करतो ज्यात काही ना काही सामाजिक संदेश असतो. मी त्यांना माझ्या बरोबर गाणी गायला लावतो,” अण्णा सांगतात. ते आले की कुठलीही जागा अशी उजळून निघायची. शिबिर संपल्यानंतर आदिवासी गावांमधली मुलं त्यांना परत जाऊच द्यायची नाहीत. त्यांना गाणी गायला लावायची. आणि तेही न थकता गात रहायचे. आसपास मुलं असायची आणि गाणीही.
ते ज्या पद्धतीने संवाद साधायचे, मुलांचे अनुभव समजून घ्यायचे त्यातूनच मला माझ्या फोटोंमधल्या लोकांशी कसा संवाद साधायचा त्याची प्रेरणा मिळाली. अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये, जेव्हा छायाचित्रणाबद्दल माझ्या कल्पना, समज तयार होत असताना मी माझे फोटो येळिल अण्णांना दाखवायचो. ते मला सांगायचे की ज्यांचे फोटो आहेत त्यांना ते नेऊन दाखव. “ते [लोक] तुझी कला आणखी कशी उंचावायची ते शिकवतील.”

शिबिर संपल्यावरही येळिल अण्णांनी तिथेच थांबावं असा मुलांचा हट्ट असतो . ‘ मुलांना सतत गाणी किंवा खेळ हवे असतात . मी त्यांना माझ्या सोबत गायला लावतो ’

सेलममध्ये ऐकू - बोलू न शकणाऱ्या मुलांच्या शाळेत फुग्यांचा खेळ सुरू आहे
या शिबिरांमध्ये मुलांमधली सृजनशीलता बाहेर यायची. त्यांनी काढलेली चित्रं, ओरिगामी आणि मातीच्या बाहुल्या, सगळं काही नीट मांडलं जायचं. मुलं त्यांच्या आईवडलांना आणि भावंडांना घेऊन यायची आणि आपल्यातली कला अगदी भाव खात दाखवायची. येळिल अण्णा त्यांच्यासाठी हा प्रसंग एखादा सोहळा असल्यासारखा साजरा करायचे. त्यांनी लोकांना स्वप्नं पहायला शिकवलं. माझं फोटोंचं पहिलं प्रदर्शन हे असंच त्यांनी पाहिलेलं, मनात जपलेलं एक स्वप्न होतं. त्यांच्याच शिबिरांमधून मला ते आयोजित करण्याची प्रेरणा मिळाली. पण माझ्याकडे त्यासाठी पैसे नव्हते.
थोडेफार पैसे हातात असले तर फोटो प्रिंट करून ठेव, असा अण्णांचा सल्ला असायचा. मी भविष्यात मोठा होणार असं ते मला नेहमी सांगायचे. माझ्याबद्दल इतरांना सांगायचे. आणि खरं तर त्यानंतरच माझा जरा जम बसायला लागला. येळिल अण्णांच्या नाटक मंडळीतले नाट्य कलाकार आणि कार्यकर्ते करुणा प्रसाद यांनी मला बीज भांडवल म्हणून १०,००० रुपये दिले होते. आणि मग पहिल्यांदा मला माझे फोटो प्रिंट करता आले. फोटोंसाठी लाकडी चौकटी कशा तयार करायच्या हेही मला अण्णांनीच शिकवलं. त्यांच्या डोक्यात हे सगळं नीट आखलेलं होतं. आणि त्याशिवाय माझं पहिलं प्रदर्शन भरलंच नसतं.
कालांतराने हे फोटो रणजीत अण्णा [पा. रणजीत] आणि त्यांच्या नीलम कल्चरल सेंटरमध्ये पोचले. आणि त्यानंतर जगभर अनेक ठिकाणी. पण या कल्पनेचं बीज रुजलं ते मात्र येळिल अण्णांच्या शिबिरात. मी त्यांच्या बरोबर प्रवास करायला लागलो तेव्हा मला कित्येक गोष्टी माहित नव्हत्या. त्या प्रवासांदरम्यान मी खूप काही शिकलो. ते मात्र कधीही माहितगार आणि नवशिक्यांमध्ये भेद करत नसत. ते आम्हाला नेहमी वेगवेगळ्या लोकांना सोबत आणायला सांगायचे. त्यांच्यामध्ये फारसे काही गुण नसले तरी. “त्यांना आपण काही नव्या गोष्टी शिकवू या. त्यांच्या बरोबर हा प्रवास तरी करू या,” ते म्हणायचे. एखाद्या माणसातलं वैगुण्य त्यांना दिसायचंच नाही. आणि अशा रितीने त्यांनी कलाकार घडवले.

तंजावुरच्या दृष्टीहीन मुलांच्या शाळेतली मुलं येळिल अण्णांबरोबर अगदी खुशीत आली आहेत . शिबिर सुरू होण्याआधी अण्णा स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधतात जेणेकरून या मुलांशी कसा संवाद साधायचा ते उमगेल . ऐकू न येणाऱ्या मुलांबरोबर काम करण्याआधी ते कानात बोळे घालतात

कावेरीपट्टिणममधल्या या मुली ओयिल अट्टम या लोकनृत्याचा सराव करतायत . येळिल अण्णा मुलांना विविध प्रकारच्या लोककलांची ओळख करून देतात
मुलांसोबत काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की “गावातली मुलं, खास करून मुली शाळेतसुद्धा खूप लाजतात. शिक्षकांना मनातले प्रश्न किंवा शंका देखील विचारत नाहीत.” ते सांगतात, “मी ठरवलं की नाटकाच्या माध्यमातून त्यांना चारचौघात कसं बोलायचं ते शिकवायचं. आणि हे करण्यासाठी मी आधी करुणा प्रसाद या नाट्यक्षेत्रातल्या कार्यकर्त्याकडून नाट्यकलेचे धडे घेतले. कलाकार पुरुषोत्तमन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुलांना नाटक शिकवायला सुरुवात केली.”
बाहेरच्या देशातल्या कलाकारांकडून शिकलेले विविध कलाप्रकार ते मुलांना शिकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वापरून पाहतात. “आम्ही आमच्या शिबिरांमध्ये पर्यावरणासंबंधीचे चित्रपट दाखवतो. आम्ही त्यांना जीव काय असतो, मग तो अगदी छोटा पक्षी किंवा किडा असो – ते समजून घ्यायला शिकवतो. आपल्या परिसरातली झाडं ते ओळखू लागतात, त्यांचं महत्त्व समजून घेतात आणि आपल्या पृथ्वीचा आदर करत तिचं रक्षण करण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. परिस्थितिकीचं महत्त्व सांगणारी नाटकं मी बसवली आहेत. आपला झाडझाडोरा आणि पशुप्राण्यांचा उगम कसा झाला ते त्यांना समजतं. हेच बघ, संगम साहित्यात ९९ प्रकारच्या फुलांचा उल्लेख आहे. आम्ही मुलांना त्यांची चित्रं काढायला सांगतो, त्यांच्याबद्दल गाणी गाऊन घेतो आणि हे सगळं पारंपरिक वाद्यं वाजवत सुरू असतं,” येळिल अण्णा सांगतात. नाटकांसाठी ते नवी गाणी लिहितात. किडे आणि प्राण्यांवरच्या नवनव्या गोष्टी ते रचतात.
येळिल अण्णांनी आजवर जास्त करून आदिवासी आणि समुद्रकिनारी राहणाऱ्या मुलांसोबत काम केलंय. पण जेव्हा केव्हा ते शहरातल्या मुलांबरोबर शिबिरं घेतात तेव्हा या मुलांना लोककला आणि उपजीविकांबद्दल फारशी माहिती नसल्याचं त्यांना वारंवार वाटायचं. म्हणून त्यांनी लोककलांमधली काही तंत्रं शहरांतल्या शिबिरात वापरायला सुरुवात केली. परईचे ढोल, पायात पैंजणासारखे दागिने घालून केलेला सिलम्बु आणि वाघाचे मुखवटे घालून केलेला नाच, पुली. “हे कलाप्रकार मुलांपर्यंत पोचलेच पाहिजेत, त्यांचं जतन व्हायला हवं असं माझं स्पष्ट मत आहे. मुलं आनंदी आणि मनमुक्त रहायची असतील तर ती ताकद या कलाप्रकारांमध्ये आहे,” येळिल अण्णा म्हणतात.

नमक्कल जिल्ह्याच्या तिरुचेन्गोडुमध्ये मुलं शिबिराच्या शेवटच्या दिवशी , ‘ प्रदर्शना ’ वेळी पराई अट्टमसाठी डफ वाजवतायत

तंजावुरमध्ये अंशतः अंध असणाऱ्या मुली फोटो काढतायत
सुंदरसे क्षण निर्माण करणं ही त्यांची हातोटी आहे. असे क्षण ज्यात मुलं आणि मोठ्यांच्याही ओठावर हसू येतं. माझ्या आई-वडलांसोबत असेच काही क्षण तयार करण्यासाठी त्यांना मला मदत केली. माझा अभियांत्रिकीचा कोर्स पूर्ण केल्यानंतर मी नोकरीविना असाच भटकत होतो, छायाचित्रणात मला रस निर्माण झाला होता, तेव्हा येळिल अण्णांनी मला माझ्या पालकांसोबत वेळ घालव असा सल्ला दिला होता. त्यांच्या आईबरोबरचं त्यांचं नातं कसं होतं त्याच्या गोष्टी ते मला सांगायचे. त्यांच्या वडलांच्या मृत्यूनंतर आईनेच एकटीने त्यांना आणि त्यांच्या चार बहिणींना मोठं केलं. त्यांच्या आईच्या संघर्षाबद्दल ऐकत असतानाच मला मोठं करण्यासाठी माझ्या आईवडलांनी काढलेल्या खस्तांबद्दल मी विचार करायला लागलो. आणि त्यातनंच मला माझ्या आईचं मोल लक्षात आलं. मी तिचे फोटो काढले,
तिच्याबद्दल
लिहिलं.
मी येळिल अण्णांसोबत प्रवास करायला सुरुवात केली आणि तेव्हाच मी नाटक बसवायला, चित्रं काढायला, रंगवायला, रंग तयार करायला शिकलो. मुलांना फोटो कसे काढायचे ते कसं शिकवायचं तेही शिकलो. आणि मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये गप्पांचं एक जगच खुलं झालं. मी त्यांच्या गोष्टी ऐकायला लागलो आणि त्यांचं आयुष्य कॅमेऱ्याने टिपायला लागलो. त्यांच्याबरोबर खेळल्यावर, नाचून, गाऊन झाल्यावर मी जेव्हा त्यांचे फोटो काढायचो तेव्हा तो चक्क एक सोहळा बनून जायचा. मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी जायचो, त्यांच्या सोबत खायचो, आई-वडलांशी गप्पा मारायचो. आणि मग माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी त्यांच्याशी मस्त गप्पा मारतो, त्यांच्या जगण्याचा भाग होतो, त्यांच्यासोबत वेळ घालवतो तेव्हाच ती सगळी मजा फोटोंमध्ये उतरते.
गेल्या २२ वर्षांत, कलिमन विरलगल सुरू केल्यापासून येळिल अण्णांचा ज्या कुणाशी संपर्क आला त्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांनी जादू आणली आणि चैतन्य. “आम्ही आदिवासी मुलांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करतो. शिक्षणाचं महत्त्व त्यांना समजावून सांगतो. मुलींना स्वसंरक्षणाचे धडेही देतो. या प्रशिक्षणातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढीला लागत असल्याचं आम्ही पाहिलंय,” ते म्हणतात. त्यांचं एकच म्हणणं आहे. आपल्या मुलांवर विश्वास ठेवा, त्यांना विवेकावर आधारित विचार आणि अभिव्यक्ती शिकवा.
“आमचा ठाम विश्वास आहे की सर्व जण समान आहेत आणि हेच आम्ही त्यांना शिकवतो,” ते म्हणतात. “आणि त्यांच्या आनंदातच माझा आनंद मी शोधतो.”

कोइम्बतोरमध्ये अण्णा ‘ आरसा ’ हा नाट्यकलेतला एक खेळ घेतायत आणि सगळा वर्ग मुलांच्या हसण्याने निनादून गेलाय

येळिल अण्णा आणि त्यांचा चमू नागपट्टिणममध्ये पक्ष्यांवरचं एक नाटक सादर करतोय

तिरु अन्ना मलाईमध्ये मुखवटे , मुकुट , पोषाख , रंगवलेले चेहरे आणि लायन किंग नाटक सादर करण्यासाठी सगळे सज्ज

सत्यमंगलममध्ये येळिल अण्णा मुलांसोबत. तुम्ही त्यांच्या आयुष्यातून मुलांना वेगळं काढूच शकत नाही. मुलांच्या अवतीभोवती असले की ते अगदी राजबिंडे दिसतात

जवद्दु हिल्समध्ये परिसरात आपण तयार केलेले रंगीत कागदी मुखवटे परिधान केलेली मुलं

कांचीपुरममध्ये ऐकू - बोलू न शकणाऱ्या मुला - मुलींच्या शाळेत ओरिगामीच्या कार्यशाळेत तयार केलेली फुलपाखरं जणू या मुलीच्या अवतीभोवती गवतावर बसलीयेत

पेराम्बलुरमध्ये मुलं रंगमंच सजवण्यासाठी स्वतः पोस्टर तयार करतायत . संपूर्ण मंच कागद आणि कापडापासून तयार करण्यात आला होता

जवाद्दुमध्ये आसपासच्या झाडांच्या फांद्या वापरून येळिल अण्णा आणि मुलं प्राण्यांचे आकार तयार करतायत

नागपट्टिणममधल्या एका शाळेत मुलांच्या गराड्यात बसलेले अण्णा

कांचीपुरमच्या कर्णबधिर मुलींच्या वसतिगृहात जुन्या सीडींपासून नाटकासाठी साहित्य बनवलं जातंय

सेलममध्ये मुलं आपण तयार केलेल्या कलाकृती दाखवतायत

सत्यमंगलममध्ये येळिल अण्णा आणि मुलं आपण तयार केलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन बघण्यासाठी गावकऱ्यांना वाजत गाजत घेऊन येतायत

कावेरीपट्टिणममध्ये शेवटच्या दिवशी येळिल अण्णा पोइ काल कुदुरई अट्टम हे लोकनृत्य सादर करतायत . यासाठी पुठ्ठा आणि कापडाचा खोटे पाय असलेला घोडा म्हणजेच पोइ काल कुदुरइ तयार केला जातो

कावेरीपट्टिणममधल्या शिबिराच्या शेवटच्या दिवशी येळिल अण्णांचा चमू आणि मुलं जोराने ओरडतायत , ‘ पापरप्पा बाय बाय , बाय बाय पापरप्पा ’
या मूळ तमिळ लेखासाठी कविता मुरलीधरन यांनी अनुवादाची बहुमोल मदत केली आहे. तसेच अपर्णा कार्तिकेयन यांनीही सहाय्य केले आहे. त्यांचे मनापासून आभार.
ता. क. - या लेखाच्या प्रकाशनाची सगळी तयारी सुरू असतानाच, २३ जुलै २०२२ रोजी आर. येळिल अरसन यांना जिलियन बॅरे सिन्ड्रोम नावाचा आजार असल्याचं निदान झालं. हा चेतासंस्थेचा एक गंभीर आजार असून शरीराची प्रतिकार संस्था चेतापेशींवर हल्ला करू लागते. या आजारामुळे हातापायाच्या टोकांवर परिणाम होतो तसंच स्नायूंमध्ये अशक्तपणा आणि पक्षाघातही होऊ शकतो.
अनुवादः मेधा काळे