माझी आई मला नेहमी म्हणायची, “कुमार मी ही माशाची पाटी हातात घेतली नसती ना तर आपण आज जिथवर आलोय ते झालंच नसतं.” मी झालो त्यानंतर एक वर्षाने तिने मच्छी विकायला सुरुवात केली. आणि त्यानंतर माझं सगळं आयुष्य माशांनी भरून गेलंय.
घरात मासळीचा वास भरून राहिलेला
असायचा. कोपऱ्यात सुकटीची एक पिशवी लटकवलेली असायची. पहिल्या पावसात रोहू मासा
यायचा आणि अम्मा त्याचं कालवण करायची. हा मासा चवीला तर मस्तच असतो पण त्याने
सर्दीसुद्धा जाते. अम्मा मांगूर, मरळ किंवा सेलप्पी (चिलापी) माशाची आमटी करायची तेव्हा
अख्ख्या घरात त्याचा घमघमाट पसरायचा.
लहान असताना मासे धरायचे आहेत म्हणून मी
कितीदा तरी शाळा बुडवली असेल. त्या काळी अख्ख्या मदुरई जिल्ह्यात सगळीकडेच पाणी
असायचं. जवाहरलालपुरम भागामध्येही विहिरी, नद्या, तळी आणि तलाव होते. मी आणि माझा
आजा एका तळ्यावरून दुसऱ्या तळ्यावर जायचो. एक जाळी असायची ती पाण्यात पसरायची, वर
ओढायची आणि मासे धरायचे. आम्ही ओढ्यावर जायचो आणि आमिष लावून मासा गळाला लावायचो.
आम्ही ओढ्यावर जाऊ नये म्हणून अम्मा
आम्हाला भुताखेताच्या गोष्टी सांगायची. पण तळ्यात कायम पाणी वाहतं असायचं आणि
आम्ही सदैव पाण्यापाशीच असायचो. मी गावातल्या इतर मुलांबरोबर मासे धरायला जायचो.
मी दहावीत होतो तेव्हा पाणी कमी व्हायला लागलं. तळी आटली आणि त्याचा शेतीवरही
परिणाम झाला.
आमच्या गावात, जवाहरलालपुरममध्ये तीन
तळी आहेत – एक मोठं तळं, एक छोटं आणि मरुदनकुलम तळं. माझ्या घराजवळच्या मोठ्या आणि
छोट्या तळ्याचा लिलाव होतो आणि गावातल्या लोकांना त्याचे हक्क मिळतात. त्यात ते
माशाचं बी टाकतात आणि त्यावर आपलं पोट भरतात. ताई (माघ, जानेवारी मध्य –
फेब्रुवारी मध्य) या महिन्यात तळ्यातले मासे धरतात. हा माश्याचा हंगाम मानला जातो.
माझे वडील तळ्यातले मासे विकत आणायला
जायचे तेव्हा मीही त्यांच्या बरोबर जायचो. सायकलला मागे एक खोकं बांधलेलं असायचं
आणि मग मासे विकत घेण्यासाठी आम्ही एका गावाहून दुसऱ्या असं भरपूर फिरायचो.

मदुरई जिल्ह्यातल्या कल्लनदिरी गावात मार्च महिन्यात होणाऱ्या मासळीच्या सणात गावातले लोक सहभागी होतात
मदुरई जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये मासळी धरण्याचे सण साजरे केले जातात. आजूबाजूच्या गावातले लोक येऊन मासळी धरतात. चांगला पाऊस पडू दे, चांगलं फळू-फुलू दे आणि सगळेच सुखी रहावे यासाठी लोक देवाला साकडं घालतात. मासळी धरली तर पाऊस चांगला येतो असा इथल्या लोकांचा विश्वास आहे. आणि जर हा सण साजरा केला नाही तर दुष्काळ पडेल अशी भीती देखील त्यांच्या मनात आहे.
अम्मा नेहमी सांगायची की या सणाच्या काळात माशाचं वजन सगळ्यात जास्त भरतं, आणि अर्थातच चार पैसे जास्त मिळतात. लोकांना बहुतेक वेळा जिवंत मच्छी हवी असते. हंगाम नसतो तेव्हा माशाचं वजन पण जास्त नसतं आणि जास्त मासळी मिळत पण नाही.
आमच्या गावातल्या अनेक स्त्रियांनी
मासळी विकून आपला प्रपंच सांभाळला आहे. ज्याना नवरा नाही अशा अनेकींसाठी हे काम
त्यांच्या पोटाचा आधार बनलं.
या माशांमुळेच मी एक चांगला
फोटोग्राफर झालो बहुतेक. २०१३ साली मी एक कॅमेरा खरेदी केला तेव्हा मी तो सोबत
घेऊन मच्छी विकत घ्यायला जायचो. कधी कधी तर मच्छी विकत घेणं रहायचं बाजूला, मी मासेमारीचे
फोटोच काढत बसायचो. भान विसरून जायचं आणि मग उशीर केल्याबद्दल अम्माचा फोन यायचा
आणि मला ओरडा खावा लागायचा. तिथे मासळीचं गिऱ्हाईक थांबलेलं असायचं. मग मी धावत
पळत जाऊन मच्छी विकत घ्यायचो.
तळ्यावर फक्त माणसं नसायची. तिथे
पक्षी असायचे, गाई-गुरं असायची. मी एक टेलीलेन्स घेतली आणि मी पाण्याजवळच्या
प्राणी-पक्ष्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. बगळे, बदकं आणि असंख्य छोटे-मोठे
पक्षी. ते पक्षी पाहणं आणि त्यांचे फोटो काढणं माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब
असायची.
आजकाल पाऊस नाही, तळ्यात पाणी नाही
आणि मच्छीही नाही.
*****

सेन्थिल कलई त्यांनी पकडलेला कम्म पारई (रुपचंद) मासा दाखवतायत. त्यांना फोटो काढून घ्यायला आवडतं
मी कॅमेरा घेतला तेव्हा मी मच्छीमारांचे फोटो काढायला लागलो. पिचई अण्णा, मोक्का अण्णा, कार्तिक, मरुधु, सेंथिल कलई तळ्यात जाळी फेकून मासे धरायचे. मी त्यांच्यासोबत तेच जाळं फेकून मासे धरायला लागलो तेव्हा मी किती तरी गोष्टी शिकलो. ते सगळे मदुरई ईस्ट तालुक्यातल्या पुडुपट्टी गावाजवळच्या एका वस्तीत राहतात. इथली लोकसंख्या अंदाजे ६०० आहे आणि त्यातल्या ५०० लोकांचं पोट तरी मासेमारीवर अवलंबून आहेत.
सी. पिचई ६० वर्षांचे आहेत. मच्छीमार
असलेले पिचई अण्णा मासेमारी करत पार तिरुनेलवेली, राजपालयम, तेंकासी, करइकुडी,
देवकोट्टई आणि इतर ठिकाणी जाऊन आले आहेत. वयाच्या १० व्य़ा वर्षी ते आपल्या
वडलांकडून मासेमारी करायला शिकले. त्यांच्यासोबत ते फिरायचे, मासे धरायचे आणि कधी
कधी तर जास्त मासळी घावण्यासाठी काही दिवस बाहेरच रहायचे सुद्धा.
“आम्ही वर्षातले सहा महिने मासे
धरतो. मग त्या सहा महिन्यात धरलेले मासे आम्ही विकतो. उरलेली मासळी सुकवतो. असं
करून वर्षभर थोडा थोडा पैसा येत राहतो,” पिचई अण्णांनी मला सांगितलं होतं.
स्थानिक मासे मातीत अंडी घालतात आणि त्यांची
पिल्लं मातीतच जन्माला येतात. पावसाच्या पाण्यावर त्यांचं पोषण होतं असं ते
सांगतात. “केळुथी, कोरवा, वरा, पांपुपिडी केंडपुडी, वेलिची हे स्थानिक मासे पूर्वी
भरपूर मिळायचे. पण आताशा ते घावत नाहीत. शेतीत वापरल्या जाणारी रसायनं तळ्याच्या
पाण्यात विरघळतात. आजकाल सगळ्या माशांचं उत्पादन कृत्रिम रित्या केलं जातंय.
त्यांचं खाणंसुद्धा कृत्रिम आहे आणि त्यामुळे तळ्याची उत्पादकता आणखी कमी होत
चाललीये,” ते म्हणतात.
मासेमारीचं काम नसलं तर पिचई अण्णा ते कालवे
बांधणे वगैरे रोजगार हमीच्या कामांवर जातात. इथे या कामांना 'नूर नाल पनी' असं म्हटलं
जातं. किंवा मग जे मिळेल ते काम ते करतात.


डावीकडेः मरळ मासा हातात घेतलेले सी. पिचई. उजवीकडेः
वाय. पुडुपट्टी वस्तीवरचे मोक्का अण्णा हे फार अनुभवी मच्छीमार आहेत. ते सांगतात
की आरा, केंडई, ओतई केंडई, तर केंडई आणि कलपासी या माशाच्या प्रजाती आज काल
मिळेनाशा झाल्या आहेत
तीस वर्षांचे मोक्का अण्णादेखील मासेमारीचा हंगाम संपला की रोजंदारीवर मजुरीला जातात. त्यांची बायको एका खानावळीत वाढप्याचं काम करते. त्यांचा एक मुलगा दुसरीत तर एक तिसरीत शिकतो.
ते लहान असतानाच त्यांची आई गेली आणि
त्यांच्या आजीनेच त्यांना लहानाचं मोठं केलं. ते म्हणतात, “मला अभ्यासाची बिलकुल
आवड नव्हती. मग मी शेतात काम करायला लागलो किंवा मग पडेल ती, मिळतील ती कामं. पण
माझ्या मुलांनी मात्र चांगलं शिक्षण घ्यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यांना
चांगली कामं तरी मिळतील.”
*****
मलकलई हाताने जाळी विणतात. त्यांच्या वाडवडलांकडून ते ही कला शिकलेत. “फक्त आमच्या ओतकडई गावात अशी हाताने विणलेली जाळी वापरली जातात. माझे आजोबा वापरायचे त्यापेक्षा ही जाळी खूपच वेगळी आहेत. ते नारळाच्या झाडाचे तंतू काढून त्याच्यापासून जाळी तयार करायचे,” ३२ वर्षीय मलकलई सांगतात. “ते नारळाची सोपटं आणि शेंड्या शोधून शोधून त्यापासून जाळी तयार करायचे. गावात अशा जाळ्यांना मागणी असायची. लोक मासे धरायला जाताना ही जाळी सोबत घेऊन जायचे.”
“मासे आणि मासेमारी हे आमचं जगणं आहे. आमच्या गावात किती तरी मच्छीमार आहेत.
जर एखादा सराईत मच्छीमार मरण पावला तर आम्ही त्याच्या तिरडीचा एक बांबू काढतो आणि
नव्या जाळ्याला आधाराला तो वापरून त्याला मानवंदना देतो. आजही आमच्या गावात ही
प्रथा तशीच सुरू आहे.”


डावीकडेः मलकलई (पुढच्या बाजूला) आणि सिंगम पाण्यातून जाळं बाहेर खेचून आणतायत. उजवीकडेः तळ्यातनं जाळं बाहेर काढण्यासाठी मच्छीमारांना पाण्यात उड्या टाकायला लागतात
“आमचे लोक तळ्याचं नुसतं पाणी पाहून यात कोणत्या आकाराचे मासे असणार ते सांगू शकतात. ते ओंजळीत पाणी घेतात. ते जर गढूळ असेल तर मासा मोठा असणार आणि पाणी नितळ असेल तर मासे छोट्या आकाराचे असा त्यांचा अंदाज असतो.”
“आम्ही मदुरई जिल्ह्यात सगळीकडे मासे
धरायला जायचो. तोंडी, करईकुडी आणि पार कन्याकुमारीच्या समुद्रापर्यंत.
तेंकासीतल्या सगळ्या तळ्यांमध्ये आम्ही मासे धरलेत. आम्ही धरणांवर जायचो. कधी कधी
तर आम्ही अगदी १० टनापर्यंत मासे धरलेत. पण मासळी कितीही धरा मजुरी मात्र तेवढीच
मिळायची.”
“कधी काळी मदुरईत २०० तळी होती, पण
शहरं इतक्या झपाट्याने वाढत चालली आहेत की तळी गायबच होऊन गेली. त्यामुळे आम्हाला
मासे धरायला लांब लांब जावं लागतंय. तळी गायब झाल्यामुळे आमच्यासारख्या पारंपरिक
मासेमारी करणाऱ्या लोकांचं आयुष्य विस्कटून गेलंय. माशाच्या व्यापाऱ्यांच्या
आयुष्यावरही परिणाम झालाय.”
“माझ्या वडलांचे तीन भाऊ. आणि माझे तीन भाऊ. आम्ही सगळे मासेमारी करतो. माझं
लग्न झालंय आणि मला तीन मुली आणि एक मुलगा आहे. आता आमच्या गावातली तरुण मुलं शाळा
आणि कॉलेजला जातात. पण तरीही त्यांना मासे धरायला आवडतं. शाळा किंवा कॉलेज सुटलं
की ते मासे पकडतात.”

मदुरईच्या जवाहरलालपुरममधल्या चिन्ना कम्मा (छोटं तळं) च्या किनाऱ्यावरच मी तळ्यातले मासे विकत घ्यायला जायचो


डावीकडेः धरणातून पाणी सोडलं की तळं एकदम जिवंत होतं असं इथल्या मच्छीमारांचं म्हणणं आहे. उजवीकडेः वाय. पुडुपट्टी गावचे सी. पिचई आपल्या सराईत मासेमारीसाठी ओळखले जातात

मदुरईच्या उत्तरेला कन्नतुरमध्ये तळ्यात मासे धरायला निघालेले मच्छीमार. मासे धरण्यासाठी आणि नंतर वाहून नेण्यासाठी लागणारं सगळं सामान घेऊन जायला ते भाड्याचा टेम्पो करतात

जास्त मासळी मिळावी यासाठी मच्छीमार मदुरईच्या जवाहरलालपुरममधल्या मोठ्या तळ्यावर जातात

माशाचं जाळं पाण्यात टाकल्यावर ते तळ्यात खोल पाण्याच्या दिशेने जातात

जास्त मासे जाळ्यात यावेत यासाठी मच्छीमार खोल पाण्यामध्ये खळबळ करतात

जवाहरलालपुरमच्या तळ्यातून मच्छीमार जाळं बाहेर ओढून काढतायत. मोक्का अण्णा (सर्वात डावीकडे) म्हणतात, ‘तळात दगड आणि काटे असतात. एखादा जरी काटा लागला तर आम्हाला चालता पण यायचं नाही. त्यामुळे जाळं टाकताना फार काळजी घ्यावी लागते’

कन्नतुरच्या छोट्या तळ्यामधून जाळं ओढून किनाऱ्यावर आणतायत

मच्छीमार आपली मासळी थोड्या उथळ पाण्यात नेतात. इथे मासे गोळा करून साठवून ठेवण्यासाठी काही सोयी केलेल्या आहेत


सी. पिचईंच्या (डावीकडे) हातातला कनडी कटला मासा. रमण (उजवीकडे) आणि त्यांना मिळालेला कटला मासा

एम. मरुधु आणि मुल्लु रोहू केंडा मासा

दिवसभरात धरलेले मासे ‘आपा’मध्ये तात्पुरते साठवले जातात जेणेकरून ते ताजे राहतात आणि संध्याकाळी बाजारात जाऊन विकता येतात

जवाहरलालपुरमच्या तळ्यात सगळ्यात जास्त आढळणारा पक्षी म्हणजे ‘नीर कागम’ – पाणकावळा

कन्नतुर तळ्याच्या काठावर खडकांवर बसून जेवणारे मच्छीमार

मासे धरायची जाळी गुंडाळून न्यायला बरी पडतात. अशा गुंडाळ्या घेऊन जाणारे मच्छीमार घरच्या वाटेवर

मच्छीमार त्यांची नाव किनाऱ्याकडे ओढून नेतायत, ती जड तर आहेच आणि मिळालेली मासळी त्यात लादलेली आहे

नावेतून घावलेली मासळी बर्फ घातलेल्या थर्माकोलच्या खोक्यांमध्ये भरली जाते. तिथून ती इतर जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी नेण्यात येईल

कधी काळी मदुरईमध्ये २०० तळी होती, पण वाढत्या शहरीकरणामुळे अनेकांचा जीवनाधार असणारी ही तळी आता गायब होऊ लागली आहेत

माशांचे बॉक्स बाजारात नेण्यासाठी कन्नतुरमध्ये एका ट्रकमध्ये लादले जातायत

जवाहरलालपुरमच्या मोठ्या तळ्यावर थेट मच्छीमारांकडून मासळी विकत घेण्यासाठी गोण्या घेऊन उभे असलेले स्थानिक मच्छीमार

माशाचा हंगाम संपायला आला आणि पाणी आटायला लागलं की मच्छीमार उरलेलं पाणी उपसून टाकतात आणि कोरवा आणि वेरल प्रजातीचे मासे धरतात

कोडीकुलममधल्या छोट्या तळ्यातलं पाणी आटलं असलं तरी अजूनही इथे मासे मिळतात

मदुरईमध्ये मिळणारा सगळ्यात चविष्ट असलेला स्थानिक उलुवा मासा

कल्लनदिरी गावातलं एक कुटुंब मासे धरायच्या सणावेळी आपण धरलेले मासे दाखवतंय